इस्लामाबाद – पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञांची गरज नाही. आता परदेशातून कर्ज घेऊन ते बुडवलेल्या दहा देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश झाला आहे. ही बाब जागतिक बँकेच्या अहवालातून उजेडात आली आहे. पाकिस्तान आता Debt Service Suspension Initiative (DSSI) च्या कक्षेतही आला आहे. म्हणजेच पाकिस्तानची परदेशातून कर्ज घेण्याची मर्यादा वाढल्याने त्यांना पैसे उधार दिले जाऊ शकत नाहीत, असेही जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक बँकेने २०२२ मधील आंतरराष्ट्रीय कर्जाची आकडेवारी सोमवारी प्रसिद्ध केली आहे. डीएसएसआयच्या कक्षेत असणार्या देशांमध्ये अंगोला, बांगलादेश, युथोपिया, घाना, केनिया, मंगोलिया, नायजेरिया, पाकिस्तान, उझबेकिस्तान आणि झांबिया या देशांचा समावेश आहे. डाटानुसार, या देशांच्या डोक्यावर २०२० च्या अखेरपर्यंत ५०९ कोटी डॉलरचे कर्ज झालेले आहे. हा आकडा २०१९ च्या आकड्यांपेक्षा ५९ टक्क्यांहून अधिक आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, पाकिस्तानचे परदेशी कर्ज ८ टक्क्यांनी वाढले आहे. इम्रान खान सरकारने ४४२ कोटी डॉलरचे कर्ज घेतले होते. ही बाब जूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात उघड झाली होती.
२०१८ च्या मध्यात म्हणजेच इम्रान खान सरकारच्या आधी पाकिस्तानवर किती कर्ज होते हे जाणून घेऊयात. त्या कालावधीत पाकिस्तानवर एकूण २४.९ ट्रिलियन रुपये इतके कर्ज होते. पाकिस्तानच्या लोकसंख्येत इतके पैसे वाटले तर प्रत्येकाच्या हातात १ लाख वीस हजार रुपये येतील. हे कर्ज गेल्या दोन वर्षात वाढून प्रति व्यक्ती १ लाख ७५ हजार रुपये झाले आहे.
पाकिस्तानवर असलेल्या कर्जापैकी इम्रान खान सरकारचे योगदान ४० टक्क्यांहून अधिक आहे, असे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले होते. त्यापूर्वीही पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती विशेष चांगली नव्हती. कोरोना संसर्गामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पाकिस्तानने यूएई, चीनसारख्या देशांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेले आहे.
पाय खोलात
पाकिस्तानवरील कर्ज का वाढले? याबाबतही वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. पाकिस्तानात कर्ज बुडवणारे मोकळे फिरत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. अडखळणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे टोमॅटो, बटाटे यासारख्या सामान्य वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वेळोवेळी वाढत आहेत. त्याशिवाय भ्रष्टाचार हे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी खोलात जात असल्याचे मुख्य कारण सांगितले जात आहे. इम्रान खानच्या पक्षाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आहेत.