इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. असे करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नीरजच्या या कामगिरीवर संपूर्ण देश आनंदात आहे. नीरजने ८८.१७ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. बुडापेस्टमध्ये मध्यरात्री त्याने सुवर्णपदक जिंकले. देशवासीयांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे नीरजला पाहण्यासाठी रात्रभरही मोठ्या संख्येने लोक जागे होते. पदक जिंकल्यानंतर नीरजने या सर्वांचे आभारही मानले. त्याचवेळी दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी अनेकांना मिळाली. त्यामुळे या सोनेरी बातमीने त्यांचा दिवस सुरू झाला. नीरजच्या भाल्याने ८८.१७ मीटर अंतर गाठले आणि तो जगज्जेता ठरला. या क्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. राष्ट्रकुल चॅम्पियन अर्शद नदीमने 87.82 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदक जिंकले, तर झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजने 86.67 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले.
बुडापेस्टमध्ये सुवर्णपदक जिंकूनही नीरज थोडा उदास दिसत होता. तो म्हणाला, “मला आज रात्री ९० मीटर पेक्षा जास्त भाला फेकायचा होता. पण त्यासाठी सर्व काही माझ्या बाजूने असले पाहिजे. आज संध्याकाळी मी सर्वकाही एकत्र करू शकलो नाही. कदाचित पुढच्या वेळी मी करू शकेन. दुसऱ्या फेरीनंतर, मी धक्का देण्याचा विचार करत होतो. कारण मला माहित होते की मी एक चांगला थ्रो करू शकतो. पण तंत्र आणि वेगावर खूप दबाव असतो. पात्रता फेरीत आम्हाला खूप धक्का द्यावा लागतो. पात्रता फेरीनंतर रिकव्हरीसाठी फक्त एक दिवस होता, त्यामुळे तो अपुरा होता. सरावामुळे मी स्वत:ला पुढे ढकलण्याच्या आणि चांगले फेकण्याच्या प्रेरणेने शेवटच्या थ्रोमध्ये जातो.”
नीरज व्यतिरिक्त डीपी मनू आणि किशोर जेना यांनीही जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेकच्या अंतिम फेरीत भाग घेतला होता. किशोर जेना ८४.७७ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पाचव्या आणि डीपी मनूने ८४.१४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सहावे स्थान मिळविले. नीरजचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक होते, २०२२ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले होते. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये महिलांच्या लांब उडीच्या जागतिक स्पर्धेत देशासाठी कांस्यपदक जिंकले होते.
२०२१ च्या टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्णपदकानंतर, जागतिक ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेतील नीरजची आजची सुवर्ण कामगिरी कोट्यवधी भारतीयांचा सन्मान वाढवणारी, भारतीय क्रीडाक्षेत्राला ऊर्जा देणारी, देशातील तरुण पिढीला खेळांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे. जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेत आतापर्यंत भारताला केवळ तीन पदके मिळाली आहेत. २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. गेल्यावर्षी नीरज चोप्रा याने रौप्यपदक जिंकले होते. यंदा सुवर्णपदकाला गवसणी घालून त्याने देशासाठी जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेतील पदकांचं वर्तुळ पूर्ण केले आहे, याच स्पर्धेत भालाफेकपटू किशोर जाना याने ८४.७७ मीटर भालाफेक करून पाचवे स्थान मिळविले आहे. भालाफेकपटू डी.पी. मनू याने ८४.१४ मीटर भालाफेक करून सहावे स्थान मिळविले आहे.
World Athletics Championship Neeraj Chopra Win Gold Medal
Historic First Indian