गॅबरोन (दक्षिण आफ्रिका) – सोने आणि चांदी या धातूपेक्षाही हिरा-मोती हे मौल्यवान रत्न मानले जातात. दक्षिण आफ्रिकेत मौल्यवान रत्नाच्या तथा धातूच्या मोठ्या खाणी असून या ठिकाणी जगातील तिसरा मोठा हिरा सापडल्याचा दावा बोत्सवाना या देशाने केला आहे. विशेष म्हणजे हा हिरा १ हजार ९८ कॅरेटचा आहे. आतापर्यंत सापडलेला जगातील तिसरा मोठा हिरा असल्याचे मानले जात आहे.
बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष मोकग्वेत्सी मासीसी यांना हा मौल्यवान हिरा सादर करण्यात आला आहे. यावेळी मासीसी म्हणाले की, नियमांनुसार त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी केला जाईल. यापुर्वी सन १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ३ हजार १०६ कॅरेटचा सर्वात मोठा हिरा सापडला. त्याचे नाव ‘कुलिलन’ असे ठेवले होते.
२०१५ मध्ये दुसर्या क्रमांकाचा १ हजार १०९ कॅरेटचा हिरा मिळाला. त्याचे श्रेयही आफ्रिकेतील सर्वात मोठे हिरा उत्पादक असलेल्या बोत्सवाना देशाला जाते. त्या हिऱ्याला ‘लेसेडी ला रोना’ हे नाव मिळाले होते. आता या महिन्याच्या सुरुवातीस गॅबरोनपासून ७५ मैलांच्या अंतरावर असलेल्या व्हेनग खाणीत हा मोठा हिरा आढळला आहे.
बोत्सवाना सरकारच्या सहकार्याने ही खाण डेबसवाना ही डायमंड कंपनी चालवित आहे. नव्या हिऱ्याची माहिती देशाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले की, हा हिरा ७३ मिमी लांब आणि ५२ मिमी रुंदीचा आहे. कंपनीने विक्री केलेल्या एकूण हिरा उत्पादनापैकी ८० टक्के रक्कम सरकारला महसूल म्हणून दिली जाते. कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हिरा आहे.