नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कामगार व व्यवस्थापन यांच्यातील मित्रत्वाचे ऋणानुबंध व कारखान्याप्रती असलेली कृतज्ञता जपत सातपूर औद्योगिक वसाहतीतील २२ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या नाटेलको या कारखान्यातील कामगार व व्यवस्थापन प्रतिनिधी एकत्र आले. एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात त्यांनी गप्पाटप्पा करीत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेकांना गहिवरून देखील आले.
नाटेल्को ही कंपनी सातपूर मध्ये १९८९ पासून टेलिकॉम या क्षेत्रात कार्यरत होती. नाशिक जिल्ह्यात ही टेलिकॉम क्षेत्रात नावाजलेली मोठी कंपनी होती. कंपनीत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर डिप्लोमा, डिग्री कामगार काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, नवीन टेक्नॉलॉजी आल्याने कालांतराने कंपनीतील उत्पादन कमी झाल्याने २००१ पासून बरेच इंजिनियर काम सोडून गेले. अखेर मे २००३ मध्ये कंपनी बंद पडली. कंपनीतील कामगार आणि इंजिनियर इतरत्र काम करू लागले. आज बऱ्याच मोठ्या हुद्द्यावर येथील कामगार व व्यवस्थापन प्रतिनिधी काम करत आहे. तर काहींनी स्वतःची कंपनी स्थापन केली आहे.
दरम्यान, आज २२ वर्षानंतर सर्व कामगारांनी व व्यवस्थापन प्रतिनिधीनी एकत्रित यावे अशी इच्छा लखीचंद पाटील यांनी व्यक्त केली. तसा संदेश त्यांनी व्हाट्सअँपग्रुपवर टाकत सर्वाना निमंत्रित केले. त्याला सर्व कामगार व व्यवस्थापन प्रतिनिधिनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुमारे दिडशेहून अधिक कामगार एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेकांना गहिवरून आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण आव्हाड, सुभाष निखाडे, एल एम पाटील , जयश्री नहीरे, शर्मिला जगताप, शैलेश वाघ, सविता परदेशी, अलका गवळी, संजय दीक्षित आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन एल एम पाटील यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
परराज्य व परदेशातूनही आले कामगार
कंपनी बंद पडल्यानंतर परराज्यसह परदेशात स्थायिक झालेल्या कामगार व व्यवस्थापन प्रतिनिधिनी हजेरी लावत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.