लिफ्टच्या खड्ड्यात पडून कामगाराचा मृत्यू
नाशिक : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमधील लिफ्टच्या खड्ड्यात पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना अंबडमध्ये घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दत्ता विष्णू काळे (वय ३७, रा.साफल्य बंगल्याजवळ, तिडके कॉलनी, नाशिक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दत्ता काळे आव्हाड हॉस्पिटलसमोरील एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. इमारतीच्या तिसर्या मजल्यावरुन तोल जावून ते लिफ्टच्या खड्ड्यात पडले. त्याते ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ कामगारांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बेडवाल करत आहेत.
……
भरधाव कारच्या धडकेत तरुणी जखमी
नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२६) रात्री १० वाजेदरम्यान प्रसाद सर्कल, गंगापूररोड येथे घडली. याप्रकरणी अशोककुमार मोतीलाल जैन यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित कारचालक जयवंत पिसोळकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अशोकमुकार जैन यांची मुलगी आशिका (वय २१) दुचाकी (एमएच १५-जीडी २४९७)वरुन गंगापूर रोडने जात होती. ती प्रसाद सर्कल परिसरात आली. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कार(एमएच १५-जीएफ ७६६३)ने तिला धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी आली.
पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सांगळे करत आहेत.
……