नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोनाच्या संकटकाळात ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती रूजली. आता देशातील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. संकट ओसरले असले तरी अनेक उद्योग, कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची पद्धत सुरूच ठेवली आहे. अनेक कंपन्या, उद्योगांना हीचपद्धत सुविधाजनक वाटते आहे. पण, यामुळे कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनावर वाईट परिणाम होतो आहे. कौटुंबिक कलह, तणाव आणि त्यातून नैराश्य येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास आणि भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) अमृतसर येथील तज्ज्ञांनी केलेल्या संयुक्त अभ्यासातून ही बाब अधोरेखित झाली आहे. हा अभ्यास ‘एम्प्लॉई रिलेशन्स’ या प्रख्यात नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यातील निष्कर्ष कर्मचाऱ्यांसोबतच समाजातील प्रत्येक घटकाची चिंता वीढविणारा आहे.
कर्मचारीकेंद्रित धोरण गरजेचे
या समस्येवर उपायसुद्धा सुचविण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ नये, यासाठी ‘कर्मचारी समस्या – केंद्रित धोरण’ गरजेचे आहे. त्यानुसार नियोजन करून उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तसेच मित्रांपर्यंत सक्रियपणे पोहोचणे गरजेचे आहे.
अभ्यासात विचारलेले प्रश्न?
‘वर्क फ्रॉम होम’मुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यालय आणि कुटुंब यातील सीमामर्यादांचे उल्लंघन झाले आहे का? ही संकल्पना फलदायी किंवा अपयशी ठरण्यात स्त्री-पुरुष भेद भूमिका बजावतो का? ही पद्धत कोरोनानंतरही चालू ठेवल्यामुळे कर्मचारी नाखूश आहेत का? विवाहितांमध्ये मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला. त्यांच्या नात्यात नवीन गुंतागुंत निर्माण झाली आहे का?
कार्यालयीन कामावर परिणाम
‘वर्क फ्रॉम होम’मुळे कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम झाला आहेच. शिवाय कार्यालयीन कामांनाही फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांमध्ये आपण एक अपयशी पालक, अयशस्वी व्यावसायिक आहोत, अशी भावना बळावू लागली आहे. भारतात पारंपरिक स्त्री-पुरुष भेदामुळे कुटुंबांमध्येही आणखी तणाव निर्माण झाला असल्याची बाब अभ्यासात समोर आले आहे.
Work From Home Effect Family IIT Research Report