लंडन – अमेरिका, ब्रिटन येथील नागरिकांसाठी प्रिय व्यक्तीचे चुंबन घेणे ही काही खासगी बाब नाही. सार्वजनिक स्थळी सुद्धा एकमेकांचे चुंबन घेण्यात त्यांना गैर वाटत नाही. पण हेच चुंबन ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना महागात पडले आहे. सार्वजनिक स्थळी चुंबन घेतल्यामुळे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ज्या देशांमध्ये चुंबन ही अतिशय सामान्य बाब आहे, त्याठिकाणी असे घडण्यामागचे कारण काय, हा प्रश्न स्वाभाविक आहे. परंतु, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता आरोग्य मंत्रालयातील आपल्या महिला सहकाऱ्याचे सार्वजनिक स्थळी चुंबन घेतल्यामुळे हॅनकॉक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हॅनकॉक यांनी राजीनामा देताना आपल्या हातून मोठी चूक झाली आहे, असे कबुल केले आहे. तर इंग्लंडचे पंतप्रधान बोरीज जॉन्सन यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे मत नोंदवले आहे. आरोग्य खात्याची जबाबदारी साजिद जावेद यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मुख्य म्हणजे हॅनकॉक यांनी कुणाचे चुंबन घेतले, हा प्रश्न अनेकांना पडत आहे. आरोग्य मंत्रालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या गिना कोलाडंगेलो यांचे चुंबन हॅनकॉक यांनी घेतले. पण दुर्दैव बघा. ६ मे रोजी चुंबन घेतलेला फोटो आत्ता प्रसिद्ध झाल्यामुळे हॅनकॉक यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दडपण आले. या फोटोमध्ये आरोग्य मंत्रालयाच्या परिसरातील असल्यामुळे त्यावरून अधिकच वादळ उठले. परिणामी गिना यांनाही आरोग्य खात्यातील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
दोघेही जुने मित्र
हॅनकॉक आणि गिना जुने मित्र आहेत. याच मैत्रीखातर गिना यांना सरकारमध्ये गलेलठ्ठ पगारावर नोकरी मिळाली होती. त्यामुळे आता या वादात त्यांच्या नियुक्तीवरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.