नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – साउदी अरब म्हटले तर सर्वप्रथम डोळ्यासमोर भीषण उष्णता, वाळवंट आणि पाण्याचा तुटवडा असलेले चित्र डोळ्यासमोर उभे राहते. परंतु भीषण उष्णता आणि वाळवंट असलेल्या प्रदेशात बर्फवृष्टी झाली तर, नागरिकांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साउदी अरबमध्ये अशीच घटना घडली आहे. साउदी अरबच्या वायव्य भागातील तबुक शहरात जोरदार बर्फवृष्टी झाली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
नागरिकांनी केले पारंपरिक नृत्य
तबुक शहरात बर्फवृष्टी होऊ लागल्यानंतर येथील स्थानिक नागरिक खूपच आनंदित झाले होते. त्यांनी पारंपरिक नृत्य करण्यास सुरुवात केली. बर्फवृष्टी होताना पारंपरिक नृत्याचा व्हिडिओ या दिवसात चांगलाच व्हायरल होत आहे. तबुक शहरात यापूर्वी अनेकदा बर्फ पडण्याचा नजारा पाहायला मिळाला आहे. परंतु संगीताच्या तालावर अशा प्रकारे पारंपरिक नृत्य करणारे नागरिक खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळाले आहे.
तबुकमध्ये बर्फाने झाकला पर्वत
तबुकजवळ असलेल्या अल-लॉज पर्वतावर हजारोंच्या संख्येने पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पोहोचले. सउदी अरबच्या या शहरात गेल्या वर्षी जोरदार बर्फवृष्टी झाली होती. गेल्या ५० वर्षांचा विक्रम या बर्फवृष्टीने मोडला होता. सउदी अरबची सरकारी वृत्तसंस्था एसपीएने बर्फाच्या चादराने झाकलेल्या कारचा फोटो पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये नागरिक बर्फाचा आनंद घेत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. येथील अल-लॉज, जबाल ताहिर आणि जबाल अलकान हे पर्वत बर्फाच्या चादरीने झाकले गेले आहेत.
https://twitter.com/AlMnatiq/status/1477303227980865538?s=20
बदाम पर्वत
स्थानिक माध्यमाच्या वृत्तानुसार, सउदी अरबमध्ये दरवर्षी जबल अल-लॉज, जबाल अल-ताहिर आणि तबुकमध्ये जबाल अलकान पर्वतांवर दोन ते तीन आठवड्यांपर्यंत हिमवृष्टी होत असते. हा पर्वतीय प्रदेश सउदी अरबच्या वायव्य भागात आहे. जबाल अल -लॉज २,६०० मीटर उंच पर्वत आहे. त्याला बादाम पर्वतही म्हटले जाते. कारण पर्वताच्या उतारावर बदामाची झाडे आहेत. तबुक शहर जॉर्डनला लागून आहे. बर्फ वितळल्यानंतर या भागात सुंदर दृष्य दिसते.