मुंबई – तंत्रज्ञानाने अनेकानेक संधी निर्माण केल्या आहेत. यातील कोणती संधी कधी येईल हे सांगता येत नाही. वाढत्या स्पर्धेमुळेही संधींना पाय फुटतात. आताही तसेच झाले आहे. सर्वाधिक लोकप्रिय अॅप फेसबुकने सध्या जबरदस्त ऑफर आणली आहे. ती म्हणजे, आमचे फिचर वापरा आणि चक्क लाखो कमवा. ही संधी नेमकी कुणाला आणि कशी आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत…
प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा (आधीचे फेसबुक) कंपनीकडून २०२२ अखेर क्रिएटर्सना १ अब्ज डॉलर (जवळपास ७४,३१, ०८,५०,००० कोटी रुपये) परतफेड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असा खुलासा मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जुलै महिन्यात केला होता. त्या दरम्यान त्यांनी यासंदर्भात अधिक तपशील दिले नव्हते. परंतु द इन्फॉर्मेशन या नियतकालिकात प्रकाशित एका अहवालात यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
अहवालानुसार, मेटाचे मालकी हक्क असलेल्या फेसबुक प्लॅटफॉर्मच्या लाइव्ह ऑडिओ रूम या फिचरचा वापर करण्यासाठी क्रिएटर्सना (कलाकारांना) ५०, हजार डॉलर (जवळपास ३७ लाख रुपये) परतफेड करण्यात येणार आहेत. ऑडिओ अॅप क्लब हाउसला आव्हान देण्यासाठी मेटातर्फे ऑडिओ रूम लाइव्ह तयार करण्यात आले आहे. या फिचरच्या अनावरणानंतर जगभरात ते खूपच प्रसिद्ध झाले आहे.
त्या व्यतिरिक्त मेटाच्याच इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर रिल पोस्ट करण्यासाठी क्रिएटर्सना ३५ हजार डॉलर (जवळपास २६ लाख रुपये)ची परतफेड करण्यात येणार आहे. संगीतकार आणि इतर क्रिएटर्सना त्यांचे पाच महिन्यांचे जुन्या लाइव्ह ऑडिओवर प्रति सत्र १० हजार ते ५० हजार रुपयांची परफेड करण्याचे नियोजन फेसबुककडून करण्यात येत आहे. तसेच १० हजार डॉलरहून किंवा त्याहून अधिक शुल्क पाहुण्यांना अदा करण्यात येणार आहे.
पैसे मिळण्यासाठी काय करावे
फेसबुकवर कलाकारांनी किमान ३० मिनिटांच्या चार ते सहा सत्रात आपल्या कलेचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे असे बोलले जात आहे. फेसबुकने जूनमध्ये ऑडिओ सेवेत लाइव्ह ऑडिओ रूम्ससह पॉडकास्टची सुरुवात केली होती. अमेरिकेत श्रोत्यांना निवडक पॉडकास्ट उपलब्ध असेल. लाइव्ह ऑडिओ रूम होस्ट करणार्या अॅडमिनला चर्चेदरम्यान सपोर्टसाठी नॉन प्रॉफिट किंवा फंडरेझरची निवड करण्याचा पर्याय मिळेल. ऐकणारे आणि बोलणारे यावर थेट दान करू शकतात, असे फेसबुकचे म्हणणे आहे.
ऑडिओ सेशनमध्ये किती स्पिकर
फेसबुक लाइव्ह ऑडिओ सेशनमध्ये आयोजकाला ५० स्पिकर जोडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. श्रोत्यांच्या संख्येला कोणतीच मर्यादा नाही. त्यामुळे फेसबुकवर कोणत्याही लाइव्ह ऑडिओ रुममध्ये श्रोते सहभागी होऊ शकतात.