इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दैनंदिन जीवन जगत असताना आपण भूतकाळात काय घडले याचा विचार करीत स्मरणरंजन करीत असतो. त्याचप्रमाणे भविष्यात काय घडणार? याची देखील मनुष्याला चिंता असते, त्यासाठी बहुतांश जण आर्थिक नियोजन करतात. सध्याचा काळ तर अत्यंत ताणतणावाचा असून वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढलेले दिसून येत आहेत. त्यातच कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे.
कोरोना महामारीपासून प्रत्येक माणसाला विम्याचे महत्त्व समजू लागले आहे. पण सर्वसामान्य माणसाला विमा काढणे इतके सोपे नाही. याचे कारण म्हणजे विमा काढण्यासाठी प्रिमियमच्या स्वरूपात पैसे भरावे लागतात, आपण जर कमी खर्चात विमा घेण्याचा विचार करत असाल, तर केंद्राची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या विमा पॉलिसी अंतर्गत, तुम्ही वार्षिक फक्त 12 रुपये जमा करून 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवू शकता. जाणून घेऊ या त्याबद्दलची सविस्तर माहिती…
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत, विमाधारकाला अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास, 1 लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे. या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे. त्याचा प्रीमियम मे महिन्याच्या शेवटी जमा केला जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम 31 मे रोजी तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते. त्यामुळे लक्षात ठेवा की, तुम्ही PMSBY घेतला असेल तर तुमचे बँक खाते रिकामे ठेवू नका.
आपल्याला दुखापत झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास, दाव्याची रक्कम विमाधारकाच्या खात्यात दिली जाईल. अपघाती मृत्यू झाल्यास, नॉमिनीच्या खात्यात पैसे दिले जातील. रस्ता, रेल्वे किंवा तत्सम इतर कोणत्याही अपघातात मृत्यू, पाण्यात बुडणे, संकटात सापडल्यास पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असेल. सर्पदंश, झाडे पडणे यासारख्या अपघातांमध्ये रुग्णालयातील नोंदींच्या आधारे दावे उपलब्ध होतील.
आपण PMSBY मध्ये नोंदणीसाठी, कोणत्याही बँकेत अर्ज केला जाऊ शकतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बँक मित्र किंवा विमा एजंटचीही मदत घेऊ शकता. सरकारी विमा कंपन्या आणि अनेक खाजगी विमा कंपन्या बँकांच्या सहकार्याने या योजना देत आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना एक वर्षासाठी वैध आहे. त्यानंतर तुम्हाला दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे, 8 ते 70 वयोगटातील व्यक्ती असावी, आधारसोबत जन धन किंवा बचत बँक खाते असावे, बँक खात्यातून ऑटो-डेबिटसाठी संमती हवी, प्रीमियम प्रतिवर्ष फक्त 12 रुपये इतका आहे.