नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनची (फिफा-आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ ) १७ वर्षांखालील महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठीच्या हमीपत्रांवर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे.
फिफा १७ वर्षांखालील महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा भारतात ११ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणार आहे. ही सातवी द्विवार्षिक युवा स्पर्धा असून भारतात आयोजित करण्यात येणारी फिफाची महिलांसाठीची ही पहिलीच स्पर्धा असेल.फिफा १७ वर्षांखालील पुरुष विश्वचषक २०१७ स्पर्धेचा आत्मविश्वासपूर्ण वारसा पुढे नेत, भारत देश महिला फुटबॉलसाठी अत्यंत महत्त्वाच्या क्षणाची तयारी करत आहे. या स्पर्धेत जगभरातील सर्वोत्कृष्ट तरुण महिला फुटबॉलपटू प्रतिष्ठित चषक उचलण्यासाठी त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज आहेत.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) मैदानाची देखभाल, स्टेडियममधील वीज, ऊर्जा आणि केबलिंग, स्टेडियम आणि प्रशिक्षणस्थळ, ब्रँडिंग इत्यादीसाठी १० कोटी रुपयांच्या आर्थिक साहाय्याची पूर्तता, राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफ ) साहाय्य योजनेसाठी असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून केली जाणार आहे.
फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक ही फिफाद्वारे आयोजित १७ वर्षांखालील किंवा १७ वर्ष वयापर्यंतच्या महिला खेळाडूंसाठीची जागतिक स्पर्धा आहे. या स्पर्धा २००८ मध्ये सुरू झाल्या आणि पारंपरिकपणे सम-संख्येच्या वर्षांत आयोजित केल्या जातात. ६ वी स्पर्धा उरुग्वे येथे १३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. स्पेन हा फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक स्पर्धेचा सध्याचा विजेता आहे. सातवी फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक स्पर्धा यंदा भारतात होत आहे. त्यात भारतासह १६ संघ सहभागी होतील. ऑल इंडिया फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) (a) भुवनेश्वर; (b) नवी मुंबई आणि (c) गोवा या ३ ठिकाणी सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारताने ६ ते २८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत फिफा अंडर-17 पुरुष विश्वचषक इंडिया-२०१७ स्पर्धेचे, नवी दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, गोवा, कोची आणि कोलकाता या ६ वेगवेगळ्या ठिकाणी यशस्वी आयोजन केले होते .