लखनऊ (उत्तर प्रदेश) – शिक्षण क्षेत्र हे अत्यंत पवित्र कार्य मानले जाते. मग शाळा असो कॉलेज यामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे, हेच शिक्षक आणि प्राध्यापकांचे कार्य असते. परंतु काही वेळा शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळिमा फासण्याचे भयानक कृत्य करण्याचे काम काही समाजकंटक करतात अशीच घटना उत्तर प्रदेशातील एका कॉलेजमध्ये घडली.
पिलीभीत शहरातील प्रतिष्ठित सरकारी महिला कॉलेजतील एक प्राध्यापक अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींना जाळ्यात अडकवून सेक्स रॅकेट चालवत होता. मात्र एका विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रभारी प्राचार्य यांनी वरिष्ठांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे.
प्रतिष्ठित महिला महाविद्यालयातील गणित विभागातील प्राध्यापक कामरान आलम खान हा विद्यार्थिनींना सापळा रचून आपल्या खोलीत घेऊन जात असे. तेथे सर्वप्रथम त्यांना मद्य देत असे. तसेच, अंमली पदार्थांचे सेवन करायलाही भाग पाडत असे. त्यानंतर या विद्यार्थिनींशी तो अश्लील कृत्य करण्याबरोबरच अवैध संबंध ठेवत असे, असा आरोप आहे. केवळ एवढ्यावरच तो थांबत नव्हता तर या विद्यार्थिनींना तो अवैध कामासाठी बाहेरही पाठवत होता.
एका तरुणीने यासंदर्भात कॉलेज प्रशासनाला फोनकरुन तक्रार दिली. त्यानंतरही कॉलेज व्यवस्थापनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. अखेर विद्यार्थिनीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अहवाल नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कॉलेज गाठून माहिती गोळा केली. आरोपी प्राध्यापकाची चौकशी केली तेव्हा कळाले की, सदर आरोपी हा मुलींवर अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी दबाव आणतो. विरोध केल्यास त्यांना कॉलेजतून काढून टाकण्याची धमकी देतो. त्याने अनेक विद्यार्थिनींशी अश्लिल संबंध ठेवले. तसेच त्यांना अपहरणाची धमकीही देण्यात आली होती.
सदर आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि सेक्स रॅकेटचा पर्दाफाश व्हावा, मागणी करण्यात येत आहे. वर्षभरापासून आरोपी विद्यार्थिनींना आपल्या जाळ्यात अडकवत होता. विशेष म्हणजे, कॉलेज मधील अनेक विद्यार्थिनींनी आरोपी प्राध्यापकाला साथ दिल्याचा आरोपही पिडीत मुलींनी केला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. मात्र सेक्स रॅकेटचे प्रकरण अजून पुढे आलेले नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.