इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मातृत्व हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. एका जीवाने दुसऱ्या जीवाला जन्म देण्याचा हा सोहळा आई म्हणून स्त्री जगत असते. अशाच एका मातेने बाळाला जन्म देऊन तीन तास होत नाही तोच दहावी बोर्डाची परीक्षा देऊन तिने शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होण्याचादेखील निर्धार व्यक्त केला आहे.
सध्या सर्वत्र परीक्षेचे वारे वाहताहेत. बोर्डाच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थी वर्षभर घेतलेल्या मेहनतीला अंतिम स्वरूप देताहेत. या पार्श्वभूमीवर बिहारमधील बांका जिल्ह्यातील रुक्मिणी कुमार या विद्यार्थिनीने बाळाला जन्म देऊन तीन तास होत नाही तोच परीक्षा देण्याचा घेतलेला निर्णय सर्वांनाच धक्का देणारा ठरला आहे. रुक्मिणी ही सरकारी शाळेत शिकते. तिने गर्भवती असतानाही अभ्यास सोडला नव्हता. त्यामुळे काहीही झालं तरी परीक्षा द्यायचीच हे तिनं ठरवलंच होतं.
तिची परीक्षा सुरु झाली तेव्हा तिला नववा महिना सुरु होता. तिच्या बाळंतपणाची तारीख जवळ येत होती. १४ फेब्रुवारीला गणिताचा पेपर देऊन ती घरी गेली तेव्हा तिला अस्वस्थ वाटत होतं. पण तरीही तिनं दुसऱ्या दिवशी विज्ञानाचा पेपर द्यायचाच, हे ठरवलंच होतं. तिला रात्रीच कळाही सुरु झाल्या होत्या. पण त्या सहन करत तिनं पेपर द्यायचा ठरवलं. जेव्हा प्रसूती वेदना असह्य झाल्या त्यावेळेस मात्र तिला रात्रीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. रात्रभर तिला त्रास होत होता. तरीही सकाळी ती पेपर द्यायला परीक्षा केंद्रावर गेली.
सासरच्यांचा भक्कम आधार
शिक्षण पूर्ण करून सक्षम, आत्मनिर्भर महिला बनण्याचे स्वप्न रुक्मिणीने उराशी बाळगले आहे. यामध्ये तिला तिच्या सासरच्या मंडळींचाही भक्कम आधार मिळत आहे. ग्रामीण भागामध्ये लग्न झालेल्या महिला सहसा शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडत नाही. मात्र, रुक्मिणीने हिंमत दाखवित शिक्षणासाठी घराचा उंबरठा ओलांडून तिच्यासारख्या अनेक ग्रामीण मुलींपुढे आदर्श उभा केला आहे.
Women’s Day Special SSC Board Exam after Delivery