नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी अधिकारी म्हटलं की काही वर्षांनी बदली होतेच. सरकारी अधिकाऱ्याची बदली म्हणजे एकप्रकारे संपूर्ण कुटुंबाची बदली असते. आणि प्रत्येक स्त्रीसाठी तिचं घर खूप महत्त्वाच असतं. त्या घराशी एक भावनिक नातं निर्माण होतं. पण बदलीच्या वेळी घर बदलताना, शहर सोडताना, नवीन शहरात जाताना नेमकी काय मानसिकता असते हे नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पत्नी सौ. मयुरा मांढरे यांनी इंडिया दर्पणच्या फेसबुक लाईव्ह मुलाखतीत सांगितलं. त्या म्हणाल्या की प्रत्येक घराशी एक वेगळं नात तयार होतं. आणि बदली झाली की थोडं वाईट वाटतं पण नवीन शहरात जायची उत्सुकता पण असते. नवीन शहरात गेल्यावर अर्धे सामान लावून झाल्यावर मी गाडी काढून ते संपूर्ण शहर बघून येते. पण तेवढीच जुन्या घराची आठवणही येते. पण नोकरीचा एक भाग असल्यामुळे आता सवय झाली आहे, असे मत मयुरा मांढरे यांनी व्यक्त केले.
इंडिया दर्पण महिला दिन विशेष फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. मयुरा मांढरे या उत्तम चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रकलेच्या आवडीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आजी आणि आईकडून ही कला माझ्याकडे आली. ग्रॅज्युएशन झाल्यावर माझं लग्न झालं. आणि लग्नानंतर मी पुढील शिक्षण घेतले. मी शिक्षण घेत होते तेव्हा मुलगी लहान होती. घर सांभाळून शिक्षण घेणं हे काहीसं अवघड आहे पण घरच्यांनी खूप सपोर्ट केला. पुढे त्या म्हणाल्या की त्यानंतर मी भारत सरकारच्या भारत भवन मध्ये काही काळ काम केले. आणि एक वर्षांच्या गॅप नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. प्रत्येक बदलीच्या ठिकाणी माझी एक खोली असते तिथे मी चित्रकलेच काम करते. नाशिकविषयी त्या बोलल्या की, आम्ही दोघेही मूळ पुण्याचे पण नाशिक हे शहर मला आवडले. हवामानाच्या दृष्टीने सुद्धा नाशिक खूप छान आहे. इतकी छान थंडी, आल्हाददायक वातावरण खूप वर्षांनी मला नाशिकमुळे अनुभवायला मिळाले. नाशिकचे लोकही खूप छान आहेत. अनेक वेगवेगळे साहित्यिक, सांस्कृतिक ग्रुप आहेत. नाशिकमध्ये मी सायकलिंग, ट्रेकिंग करायला सुरुवात केली. जशी आवड आहे तसे ग्रुप आणि लोकं इथे आहेत. कलेसाठी अत्यंत पोषक वातावरण नाशिकमध्ये आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने त्या म्हणाल्या की, प्रत्येक स्त्रीने आपली वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. स्वतःची आवड ओळखून ती जोपासली पाहिजे. आज अनेक महिला घरामध्ये खूप गुरफटून जातात पण त्याबरोबर स्वतःकडे लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे. मनात काही करण्याची इच्छा, जिद्द असेल तर त्यासाठी वेळ काढावा लागतो आणि मार्गही तयार करावा लागतो. घरात कामाची योग्य विभागणी केली, सुसंवाद राखला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कोणताही न्यूनगंड न बाळगता हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकलं तर आपण नक्की यशस्वी होतो, असा आश्वासक सल्ला त्यांनी दिला.