नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माझ्या भावाने एका प्रोजेक्टच्या पायलट प्लॅनसाठी केटाफार्मा ही छोटीशी कंपनी सुरू केली. आणि तो पायलट प्लॅन यशस्वी झाला. त्यानंतर माझ्या भावाने नातेवाईकांना कंपनीत जॉईन होण्यासाठी आवाहन केलं. मी स्वतः केमिस्ट्रीतुन पदवी घेतली होती त्यामुळे मी कंपनी जॉईन केली आणि या क्षेत्रातील प्रवास सुरु झाला, असे १०० कोटींची उलाढाल असलेल्या केटाफार्मा केमिकल्स प्रा. लि. ग्रुपच्या डायरेक्टर इंदुमती बिहाणी यांनी सांगितले.
महिला दिनानिमित्त इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये त्या बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. सुरुवातीच्या प्रवासाविषयी त्यांनी सांगितले की, मी मूळची संगमनेरच्या माहेश्वरी कुटुंबातील. संगमनेरला १९६७-६८ साली जेव्हा सायन्स कॉलेज सुरू झाले तेव्हा ज्या काळात मुली उच्चशिक्षण घेत नव्हत्या त्याकाळात आईच्या पाठिंब्याने मी केमिस्ट्रीतून शिक्षण घेतले. जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा काहीतरी करण्याची सुप्त इच्छा मनात असतेच. पण त्यानंतर लग्न झालं आणि १५ वर्ष मी गृहिणीपद सांभाळले. आणि वयाच्या ४० व्या वर्षी मी भावाच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. १५ वर्षांचा गॅप होता, त्यामुळे सुरुवातीला काम करताना पूर्ण अभ्यास करून मी मेहनत घेतली. सिन्नरला फॅक्टरी होती तेव्हा ट्रान्सपोर्टची चांगली सुविधा नव्हती. तेव्हा मी ड्रायव्हिंग शिकले. कंपनी लहान होती. आजूबाजूच्या मुलांना घेऊन आम्ही काम करायचो. मुंबई-पुण्याच्या व्यक्ती तेव्हा सिन्नरला यायला तयार नसायचे. अशावेळी आम्ही सगळ्या गोष्टी शिकून मुलांना सांगायचो. औषध निर्माणाचे काम अत्यंत जिकरीचे असते. त्यामुळे विशेष लक्ष द्यावे लागते. आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करायचो. सॅम्पल प्रोडक्ट तयार केल्यावर बाळाला जन्म दिल्याचा आनंद व्हायचा. मग ते प्रॉडक्ट आम्ही एक्स्पोर्ट करायचो आणि त्यातून आम्हाला ऑर्डर्स मिळायला लागल्या, असे त्यांनी सांगितले.
आजच्या स्पर्धेच्या युगाविषयी त्यांनी सांगितले की, रिसर्चवर आधारित आमची कंपनी आहे. त्यामुळे मेहनतीने, जिद्दीने आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करतो. कोणतंही काम आल्यावर मागे हटत नाही. फायझर, डॉ. रेड्डीज सारख्या कंपन्यांना आम्ही माल पुरवतो. चांगल्या गुणवत्तेचा माल तयार करणं, वेळेवर डिलिव्हरी, ग्राहकांचा विश्वास अभ्यासपूर्ण रिसर्च ही तत्व आम्ही पाळतो. येणाऱ्या अडचणींविषयी त्यांनी सांगितले की, कंपनी म्हटलं की अडचणी येणारच, पण त्यावर उपाय शोधणं हे गरजेचे आहे. आंदोलने, सरकारच्या किंवा रिझर्व्ह बँकेच्या बदलणारी धोरणे ही आव्हाने आहेत. अशावेळी वेळोवेळी ट्रेंनिग द्यावे लागते. नियमानुसार बदल करावे लागतात. पण हा कामाचा एक भाग आहे.
स्वतःसाठी वेळ कसा काढतात याविषयी त्या म्हणाल्या की, सध्या पुढची पिढी कंपनीत आली आहे त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी मिळतो. कॉलेजच्या काळात मला ट्रेकिंग खूप आवडायचे. रतनगड, कळसूबाई अशा अनेक ठिकाणी मी ट्रेकिंग करायचे. तसेच सध्या वाचनासाठी, गार्डनींगसाठी मी वेळ काढते. निसर्गरम्य ठिकाणी मला जायला आवडत. घरगुती औषधांचा अभ्यास करायला आवडतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बनवायला आवडते. त्यामुळे वेगळा उत्साह मिळतो. आरोग्यम धनसंपदा हे पुस्तकही मी लिहिलं आहे. महिला दिनानिमित्त त्यांनी सांगितले की, महिलांना एकाचवेळी अनेक कामे करण्याची सवय असते. त्यामुळे उद्योग व्यवसायात महिलांनी आत्मविश्वासाने यावे. मला अभिमान वाटतो की आमच्या कंपनीत अनेक महिला कार्यरत आहेत. महिलांनी आपली आवड ओळखून, आपल्या क्षमतांना वाव द्यावा, असे त्यांनी सांगितले.