बागेश्री पारनेरकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मार्च महिन्यात ‘महिला विशेष मुलाखत माला’ इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. आज अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात महिला सक्षमपणे कार्यरत आहेत. असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात आज महिला कार्यरत नाही. पण तिथपर्यंतचा प्रवास हा सोपा नसतो, अनेक अडचणी, संघर्ष यातून यशाचा टप्पा गाठलेला असतो. आणि हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. म्हणूनच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, शिक्षण,आर्थिक, उद्योग अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत.
कोरोना काळात १६ महिन्यात तब्बल ३ कोटी ६५ लाख दर्शकांची पसंती मिळालेले इंडिया दर्पण हे मराठीतील अग्रेसर न्यूज पोर्टल आहे. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून उत्तर महाराष्ट्रातील ६८ वर्षे जुने दै. जनशक्ती इंडिया दर्पणच्या हातात हात घेऊन नाशिकमध्ये सुरू झाले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दै. जनशक्तीच्या नाशिक आवृत्तीचे प्रकाशन झाले. वाचकांना हार्ड कॉपी बरोबरच डिजिटल बातम्याही याद्वारे वाचायला मिळत आहेत. तसेच इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांची यशोगाथा, त्यांचा प्रेरणादायी प्रवास वाचकांसमोर आणला जातो. आता महिला दिनानिमित्त मार्च महिन्यात महिलांच्या विशेष मुलाखती आणि त्यांच्याशी खास संवाद साधला जाणार आहे. संपूर्ण मार्च महिन्यात विविध क्षेत्रातील महिला वाचक आणि प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात असलेल्या रंगोली कुटे, सामाजिक क्षेत्रातील आसावरी देशपांडे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पत्नी मयुरा मांढरे, नृत्य क्षेत्रातील शिल्पा देशमुख, राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांशी नवी ओळख यानिमित्ताने होणार आहे.