इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
महिला टी२० विश्वचषकाचा थरार
महिला टी२० विश्वषक सध्या सुरू आहे. या महासंग्रामात जगाचे लक्ष भारतीय संघाकडे आहे. कारण, भारतीय संघाचे पारडे जड आहे. भारतीय रणरागिणींची कामगिरी अतिशय उत्तम आहे. याचसंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ क्रीडा समिक्षक जगदीश देवरे..
स्टार स्पोर्ट्स वर एक जाहिरात बघायला मिळाली. ही जाहिरात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाबद्दलची जाहिरात होती. त्या जाहिरातीत एक महिला दुकानदाराकडे येऊन त्याला सांगते की ‘शर्मा वाली जर्सी टी-शर्ट बताना’. त्यावेळी सहजपणे दुकानदार ‘रोहित शर्मा’ असं नाव लिहिलेला एक टी-शर्ट तिच्यासमोर ठेवतो आणि ती म्हणते ‘ये वाली नही’. आश्चर्याने दुकानदार त्या महिलेच्या क्रिकेटमधील ज्ञानाविषयी शंका घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच मग ती महिला म्हणते. ‘दीप्ती शर्मा वाली टी-शर्ट….’. जो सन्मान भारतामध्ये पुरुष क्रिकेट संघाला मिळतो तो महिला संघाला मिळत नाही असा आरोप किंवा हे सत्य स्वीकारण्याइतपत आमची मानसिकता येऊन पोचली आहे हेच जाहिरातीतून स्पष्ट होतांना दिसते आहे.
याच भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दोन साखळी सामन्यात प्रथम पाकिस्तानला आणि नंतर वेस्टइंडीज संघाला पराभूत करून विश्वचषक जिंकण्याच्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली होती. इंग्लंड विरुद्ध चा तिसरा सामना जर या संघाने जिंकला असता तर या संघाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला असता. परंतु, इंग्लंड विरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे, या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणे संघाला आता थोडे अवघड होऊन बसले आहे. आता हा संघ उपांत्य फेरीत पोहोचावा असे वाटत असेल तर सर्वप्रथम वेस्टइंडीजने पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकणे भारतासाठी आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतली महिला संघाची पुढची मोहीम किंवा वाटचाल आता बरीचशी वेस्टइंडीज विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर अवलंबून राहणार आहे.
पहिला सामन्यात पाकिस्तानने २० षटकात केलेल्या १४९ धावांच्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारतीय संघातर्फे जेमीमा रॉड्रिक्सने केलेल्या नाबाद ५३ धावा आणि तिला शफाली वर्मा आणि रिचा घोष यांची मिळालेली साथ यामुळे भारतीय संघाने ही सलामीची आणि पाक सारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्या विरुध्दची लढत जिंकली होती. वेस्टइंडीज संघाविरुद्ध भारताचा दुसरा सामना होता. पहिला सामना फलंदाजीच्या जोरावर जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र दीप्ती शर्माने १५ धावात घेतलेले ३ बळी हे या विजयाचे कारण ठरले. वे.इंडीजला निर्धारीत २० अवघ्या ११८ धावात रोखण्याची किमया यामुळे भारतीय संघाला साध्य करत साधता आली. पुढे मग फलंदाजी करताना रिचा घोष, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि शफाली वर्मा यांनी वैयक्तिक योगदान देवून भारतीय संघासाठी विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला.
इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाचा टी२० क्रिकेटमधला इतिहास फारसा चांगला नव्हताच. या दोन्ही संघांमध्ये झालेल्या २६ सामन्यापैकी तब्बल १९ सामने इंग्लंडने जिंकलेले होते. पर्यायाने या दोन्ही संघांमधल्या २७ व्या सामन्याचा निकालही अपेक्षेप्रमाणे इंग्लंडच्या पारड्यात पडला. परंतु अगदी शेवटच्या षटकापर्यंत भारतीय संघाने या सामन्यातली चुरस कायम ठेवली, हे महत्त्वाचं म्हणावं लागेल. जर भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळाला असता तर आपल्या ग्रुप टेबलमध्ये प्रथम स्थान पटकावून या विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी भारतासाठी निश्चित झाली असती. अर्थात, अजुन तरी भारतीय क्रिकेट संघासाठी ही मोहीम संपलेली नाही. वर नमूद केल्याप्रमाणे या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणे भारताला अजूनही शक्य आहे. किंबहुना, त्यानंतर विश्वचषक जिंकून आणण्याची क्षमता देखील या रणरागिणींकडे आहे हे विसरता येणार नाही.
Women T20 Cricket World Cup Indian Team by Jagdish Deore