प्लोरिडा (अमेरिका) – काही प्रसंग आयुष्यात क्षणिक आनंद देत असतात, पण त्या क्षणाची तुलना जगातील कुठल्याच आनंदाशी होत नसते. अर्थात आपल्या खात्यात एक हजार रुपयेच आहेत, हे आपल्याला माहिती आहे आणि बॅलन्स तपासल्यावर एक लाख रुपये असल्याचे लक्षात यावे, या आनंदाचे वर्णन होऊ शकत नाही. मात्र एटीएममधून दीड हजार रुपये काढायला गेलेल्या एका महिलेला आपल्या खात्यात चक्क साडेसात हजार कोटी रुपये असल्याचे कळल्यावर तिला भोवळच आली.
अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील ही घटना आहे. सर्वसाधारण कुटुंबातील एका महिलेच्या बाबतीत हे जे काही घडलेले आहे, ते आता जगभरात चर्चेला येत आहे. ही महिला घराजवळील एका एटीएममध्ये २० डॉलर म्हणजे जवळपास दीड हजार रुपये काढण्यासाठी गेली. अगदी काही मिनीटांसाठी का होईना ती जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत येऊन पोहोचली होती. या वृद्ध महिलेचे नाव जुलिया योंकोव्स्की आहे. तिने एटीएममधून २० डॉलर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही रक्कम काढताना तिला काही शुल्क भरावे लागेल, असा संदेश स्क्रीनवर आला. त्यामुळे बहुतेक खात्यात पैसे कमी असावे किंवा काहीतरी प्रॉब्लेम असावा म्हणून तिने बॅलन्स तपासले.
बॅलन्स तपासताच एटीएममधून आलेल्या स्लीपवरील आकडा बघून तिच्या भूवयाच उंचावल्या. या स्लीपवर ९९९९८५८५५.९४ डॉलर एवढा आकडा लिहून आला. त्याचे भारतीय मूल्य ७ हजार ४१७ कोचटी रुपये आहे. हा आकडा बघताच आश्चर्य कमी आणि भिती जास्त वाटली असे जुलिया सांगते. मला लॉटरी लागल्याचे अनेकांना वाटत असले तरीही हे अत्यंत भितीदायक आहे. कारण आपण २० डॉलर काढायला जावे आणि हजारो कोटी रुपये आपल्या खात्यात पडलेले असावे, यासारखी टेंशन वाढविणारी गोष्ट दुसरी कुठलीच नाही. त्यामुळे मी या रकमेला हात लावला नाही.
कारण अश्याप्रकारच्या रकमेवर हात मारल्यानंतर ते पैसे भरावे लागले आहेत, अश्या घटनांची मला चांगली माहिती आहे, असेही जुलियाने सांगितले आहे. त्यानंतर जुलियाने तातडीने बँक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.