इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपण स्वतः पार्वतीचा अवतार असल्याचे सांगत भगवान शंकर यांच्याशी विवाह करण्याचा हट्ट एका महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील अलीगंज येथील या महिलेच्या हट्टापुढे पोलिस हतबल झाले आहेत. जबरदस्ती केल्यास आत्महत्या करण्याची धमकी हरमिंद कौर नावाच्या महिलेने दिली आहे. त्यामुळे या प्रकाराकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पिथौरागढ येथील पोलिस अधीक्षक लोकेंद्र सिंह यांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेला पर्वतावरून खाली उतरवण्यासाठी एक पथक गेले होते. परंतु महिलेने आत्महत्येची धमकी दिल्यामुळे ते पथक रिकाम्या हातांनी परतले.
ही महिला भारत-चीन सीमेजवळ नाभिधांगच्या प्रतिबंधित परिसरात अवैधरित्या राहात आहे. तिला घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक गेले होते, परंतु महिलेने आत्महत्येची धमकी दिल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित महिला मानसिक आजारी आहे. कारण ती स्वतःला देवाचा अवतार मानत आहे. पोलिस तिला परत आणण्यासाठी गेले असता तिने स्पष्ट नकार दिला. जेव्हा तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. ही महिला आपल्या आईसोबत १५ दिवसांसाठी गुंजी येथे गेली होती. परंतु ज्या जागेवर ती राहात होती ते प्रतिबंधित क्षेत्र होते.
२५ मे नंतर तिला तिथे राहण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. पण महिलेने स्वतःला पार्वती मातेचा अवतार असल्याचे सांगत भगवान शंकरांशी लग्न करण्याचा हट्ट धरला. तिने या परिसरातून जाण्यास नकार दिला. तिला तिथून हटविण्यासाठी आता पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महिलेने ज्या ठिकाणी ठाण मांडले आहे, तिथून भाविक कैलास मानसरोवरकडे जातात. कैलास पर्वताचे निवासी भगवान शंकर यांच्या विवाह करायचा आहे, असे महिलेचे म्हणणे आहे.