इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओएनजीसीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आसाम पोलिस दलातील महिला उपनिरीक्षक आणि तिच्या होणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनीही अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या दोघांवर आहे. आरोप टाळण्यासाठी महिला उपनिरीक्षाने या प्रकरणी गुन्हा नोंदवून होणाऱ्या पतीला अटक केली. परंतु संपूर्ण प्रकरणात उपनिरीक्षकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी तिलाही अटक केली आहे.
आरोपी महिला पोलिस उपनिरीक्षकाचे जुनमणी राभा आणि तिच्या होणाऱ्या पतीचे राणा पराग असे नाव आहे. आसाममधील नागाव जिल्ह्यात जुनमणी राभा पोलिस उपनिरीक्षक पदावर तैनात होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांचाही साखरपुडा झाला होता. ओएनजीसीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जुनमणी राभा हिने होणाऱ्या पतीला अटक केली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांनी राणा पराग याच्या घरातून ११ बनावट सील आणि बनावट कागदपत्रांसह ओळखपत्रे जप्त केली आहे. या प्रकरणात राभा हिचा सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तिची चौकशी केली. नंतर तिला अटक करण्यात आली. जुनमणी राभा हिच्या बँक खात्यात २० लाख रुपये रोख जमा केली होती. ही रक्कम अज्ञातांनी जमा केली असून, तिला या रकमेचा हिशोब देता आला नाही. दोघेही लोकांची फसवणूक करत असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आपला सहभाग असल्याचे उघड होऊ नये म्हणून तिने पतीला अटक केली. परंतु नंतर पोलिसांनी तिलाही अटक केली आहे.