इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आसाममधील एका महिला उपनिरीक्षकाने तिच्या होणाऱ्या पतीला अटक केली आहे. हा तरुण बनावट ओळख दाखवून महिला उपनिरिक्षकाशी लग्न करायच्या तयारीत होता. त्याने अशाच पद्धतीने इतर अनेक तरुणींची फसवणूक केली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला उपनिरीक्षकाने त्याला अटक केली. यानंतर त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे प्रकरण आसाममधील नागाव जिल्ह्यातील आहे. येथील नागाव पोलिस ठाण्यात महिला उपनिरीक्षक जोनमणी राभा यांनी तिचा मंगेतर राणा पगग याला अटक केली आहे. बनावट ओळख दाखवून लग्न करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. महिला उपनिरिक्षक जोनमनी राभा यांनी सांगितले की, माजुली पोस्टिंगदरम्यान त्या जानेवारी २०२१ मध्ये राणा पगगला भेटल्या होत्या. दोघांची मैत्री झाली आणि प्रेमात रुपांतरही झाले. त्यानंतर राणाने स्वत:ची ओळख ओएनजीसीमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून दिली होती. काही काळानंतर लग्नाची मागणी त्याने घातली. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय भेटले आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये साखरपुडा आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये करण्याचे ठरले.
जोनमनी यांनी सांगितले की जानेवारी २०२२पासून पगगच्या कार्यपद्धतीवर त्यांना शंका येऊ लागली होती. त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला असता पगग यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्याचवेळी तो ओएनजीसीमध्येही काम करत नसल्याचे आढळून आले. तो एक एसयूव्ही चालवत असे आणि त्याच्यासोबत एक ड्रायव्हर आणि सुरक्षा कर्मचारी देखील ठेवत असे. या सगळ्यामुळे तो एका अधिकाऱ्यासारखा दिसायचा. पण जेव्हा त्याच्या वागणुकीत संशय आला तेव्हा संबंधित तरुणीने, महिला उपनिरिक्षकाने त्याच्याविषयी लोकांकडे तपास सुरु केला आणि त्याचं खरं रुप समोर आलं. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.