नवी दिल्ली – दिल्ली आणि एनसीआर तसेही क्राईमसाठी कुविख्यात आहे. दररोज मोठ्या प्रमाणात खुनाच्या घटना घडतात. अलिकडेच आणखी एक भयानक घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. दिल्लीतील मैदानगढी भागात एका तरुणाने आपल्या पूर्वीच्या प्रेमिकेसोबत लग्न करण्यासाठी आपल्या लिव्ह-इन पार्टनरची गळा घोटून हत्या केली. या क्रुरकर्मात त्याने आपल्या मित्रांची मदत घेतली. आरोपीने तरुणीचा मृतदेह राजपूर खुर्दच्या जंगलात फेकला व फरार झाला. यादरम्यान एका आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अनुज, रमजान खान आणि नौशादला अटक केली. यातील रमजान याने पोलिसांना फोन केला होता.
पोलिस उपायुक्त अतुल कुमार ठाकूर यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी मैदानगढी परिसरात राजपूर खुर्द गावातील जंगलात एका महिलेचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती कुणीतरी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे रमजानही होता. रमजानने सांगितले की घटनेच्या वेळी तो जंगलात दारू पिण्यासाठी गेला असता त्याला दोन लोक संबंधित महिलेला जंगलात घेऊन जात होते. त्याच दोघांनी महिलेची हत्या केली आणि तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. हत्या बघून घाबरल्यामुळे मी तिथून पळून गेलो व पोलिसांना माहिती दिली, असे रमजानने पोलिसांना सांगितले. प्राथमिक तपासात महिलेचा खून गळा घोटून केल्याचे आढळले आहे.
सीसीटीव्हीत आढळले
पोलिसांनी तपासादरम्यान जंगलाच्या मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज बघितले. तर त्यात दोन तरुण एका महिलेला बाईकवर घेऊन जाताना दिसले. पोलीस रमजानची कसून चौकशी करू लागले तेव्हा त्याच्या बयाणांमध्ये विरोधाभास आढळून आला. त्यामुळे त्यांना रमजानवरच संशय येऊ लागला. आणखी चौकशी केल्यावर त्याने खुन्याला आणि मृत महिलेला ओळखत असल्याचे कबुल केले. अनुजने त्याच्या मित्रांसोबत मिळून महिलेचा खून केल्याचे रमजानने सांगितल्यावर पोलिसांनी अनुजला अटक केली. त्यानंतर रमजानलाही गजाआड केले.
अशी झाली ओळख
अनुज आणि त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची दोन वर्षांपूर्वी सोशल मिडीयावर ओळख झाली होती. मैत्री वाढल्यानंतर दोघेही लिव्ह-इनमध्ये राहायला लागले. दोघांनी लग्नाची औपचारिकताही पूर्ण केली होती, मात्र याच दरम्यान अनुजची त्याच्या जुन्या प्रेयसीसोबत भेट झाली. दोघांमध्ये पुन्हा प्रेम प्रकरण सुरू झाले.