इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बलात्काराच्या प्रकरणात आरोपीला होणाऱ्या शिक्षेचा विचार करून आधुनिक काळात अनेक महिलांकडून या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे निरीक्षण अलीकडेच एका न्यायालयाने नोंदविले होते. आता केरळमधील एका न्यायालयाने महिलेचा हात धरणे हा विनयभंगाचा गुन्हा होत नाही, असे निरीक्षण नोंदविले आहे.
जवळपास दहा वर्षांपूर्वीची ही घटना आहे. केरळमध्ये एका गावात एक महिला देवळात पुजा करायला आली असताना आरोपीने तिचा हात धरून जीवे मारण्याची धमकी दिली. अश्यापद्धतीचा आरोप महिलेने केला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि खटला चालविण्यात आला. एर्नाकुलम येथील अलुवा गावातील ही घटना आहे. येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता न्यायालयाने धमकी दिल्याच्या प्रकरणात आरोपीला दोन वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. मात्र महिलेचा हात धरा म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले. महिलेचा हात धरणे किंवा तिच्याविरुद्ध बळाचा वापर करणे हा विनयभंग करण्याचा प्रयत्न मानला जाऊ शकत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.
आरोप सिद्ध होत नाही
आरोपीने आपल्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला हे महिलेला सिद्ध करता आलेेले नाही. एवढेच नव्हे तर तिचा हात धरून तिला जिवे मारण्याची धमकी दिली, हेही सिद्ध होत नाही, असेही न्यायालयाने या प्रकरणात म्हटले आहे.