नाशिक – तुम्ही जर ऑलिम्पिकचे चाहते असाल आणि तुम्हाला भारतीय महिला हॉकी संघाची नेत्रदीपक कामगिरी बघायची असेल तर उद्या म्हणजे शुक्रवार दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०० वाजता रौप्य पदकासाठी टोकियोत लढल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध ग्रेट बिटन या संघातील लढतीचे थेट प्रक्षेपण बघायला विसरू नका.
भारतीय पुरुष हॅाकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत कास्य पदक पटकावून हॅाकीतील गेल्या ४१ वर्षातला पदकांचा दुष्काळ संपविलेला असला तरी उद्या आणखी एका नव्या इतिहासाची नोंद होते की काय ? याकडे भारतीय क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये उद्या भारतीय महिला हॉकी संघ ग्रेट ब्रिटन संघाविरुद्ध कास्यपदक जिंकण्यासाठी बाजी लावणार आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत महिला हॉकी संघाला इतकी मोठी मजल अद्यापही मारता आलेली नव्हती. माञ हाच इतिहास आता नव्याने लिहिण्याची संधी सध्याच्या भारतीय महिला हॉकी संघाकडे चालून आली आहे.
ग्रेट ब्रिटन संघाविरुद्धची ही लढाई सोपी नसेल हे निश्चित. रीयो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता अशी ओळख असलेल्या दमदार ब्रिटन विरुध्द साखळी सामन्यात भारतीय संघ ४-१ अशा फरकाने पराभूत झाला होता हे विसरून चालणार नाही. परंतु, जो काही दबाव असेल तो ग्रेट ब्रिटन संघावर. कारण भारतीय संघ अपयशी ठरला तरी या संघाचे काहीही बिघडणार नाही कारण अपेक्षेपेक्षा जास्त मोठे यश या संघाने टोकियोत संपादन केलेले आहे. परंतु उद्याच्या सामन्यात जर ब्रिटनचा पराभव झाला तर त्या संघाच्या नावलौकिकाला तडा जाईल हे निश्चित. प्रतिस्पर्ध्यावर असणारा हाच दबाव भारतीय महिला हॉकी संघाला कास्य पदक मिळवून देण्याची कामगिरी सोपी करू शकतो. या संपूर्ण स्पर्धेत राणी रामपालच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने अतिशय छान कामगिरी बजावली आहे.