टोकियो (जपान) – ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाला पराभूत करून कांस्य पदकाच्या आशा उंचावलेल्या महिला भारतीय हॉकी संघाला शुक्रवारी सकाळीच पराभवाचा सामना करावा लागला. रंगतदार सामन्यात रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणार्या ब्रिटेनने भारताचा ४-३ असा पराभव केला. या पराभवामुळे महिला हॉकी संघाचे कांस्यपदकाचे स्वप्न भंगले आहे.
सामन्याच्या सुरुवातीला पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. मात्र नंतर दुसर्या क्वार्टरमध्ये ब्रिटेनने १-० अशी आघाडी घेतली ती बराच काळ टिकविली. मात्र नंतर दहा मिनिटांत चार गोल झाले. त्यामध्ये ब्रिटेनने एक तर भारताने तीन गोल केले. या गोलसह भारताने हाफ टाइमपर्यंत ३-२ अशी आघाडी मिळविली. तिसर्या क्वार्टरमध्ये ब्रिटेनने एक गोल करून ३-३ अशी बरोबरी साधली. सामन्याची शेवटची १५ मिनिटे महत्त्वाची ठरली. चौथ्या क्वार्टरच्या खेळात ब्रिटेनने गोल करून ४-३ अशी आघाडी मिळविली. भारताने सामना बरोबरी सोडविण्याचे प्रयत्न केले. मात्र ते अपुरे ठरले. अखेर ब्रिटेनने सामना एका गोलच्या फरकाने जिंकला.
बजरंग पुनिया उपांत्य पूर्वफेरीत
कुस्तीमध्ये ६५ किलोवजनी गटात बजरंग पुनियाने किर्गीस्तानच्या अरनाजर अकमातालिव्हला लोळवले. या विजयानंतर बजरंग पुनियाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे, कुस्तीपटू रवीकुमार दहियाने रौप्यपदक पटकावल्यानंतर भारताच्या नजरा आता बजरंग पुनियावर टिकल्या आहेत.
सीमा बिस्लाचा पराभव
महिला कुस्तीच्या उपउपांत्यफेरीच्या सामन्यात भारताच्या सीमा बिस्लाचा पराभव झाला आहे. तिला ट्यूनिशियाच्या सारा हमिदने १-३ असे पराभूत केले. सीमा सुरुवातीपासून पिछाडीवर होती. नंतर ती सावरू शकली नाही.