नाशिक – सुदृढ आरोग्य रहावे यासाठी अनेक जण योगासने आणि प्राणायाम करीत असतात. मात्र, शहरात एका महिलेचा प्राणायाम करीत असतानाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मखमलाबाद परिसरात झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरात व्यायाम करत असतांना ३० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोनल आव्हाड (वय ३० वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. मखमलाबाद परिसराच्या त्या रहिवासी आहेत. त्या नेहमी प्राणायाम करीत असतात. त्यानुसार आज सकाळी त्या प्राणायाम करीत होत्या. त्याचवेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. काही वेळानंतर त्या जमिनीवर कोसळल्या. हे पाहून त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनल यांना हृदयविकाराचा त्रास असण्याची दाट शक्यता आहे. तसेच, सध्या थंडीचा कडाका अचानक वाढला आहे. त्याचाही त्यांना व्यायाम करीत असताना त्रास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. व्यायाम आणि प्राणायाम यावर बहुतांश जण भर देत असताना आता थेट महिलेचा जीवच गेल्याने आश्चर्य आणि चिंताही व्यक्त केली जात आहे. उत्तम शरीरयष्टी किंवा संतुलित शरीर मिळवण्यासाठी योगासनांकडे कल वाढला आहे. मात्र झटपटरित्या फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न जीवावरही बेतू शकतो, असे फिटनेस सल्लागारांचे मत आहे. त्यामुळे अशा घटनांमधून आपण योग्य तो बोध घ्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.