नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पतीचे निधन झाल्याने बँक खाते बंद करण्यासाठी आलेल्या महिलेला स्टेट बँकेने सुखद धक्का दिला आहे. बँकेने सदर महिलेला तब्बल ३० लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. त्यामुळे सध्या या घटनेची शहरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया नंदुरबार शाखेत पगार खाते असलेल्या मृत कर्मचाऱ्याच्या नातलगांना वलेम रकमेचे वितरण मान्यवरांच्या उवस्थितीत करण्यात आले. कै चरणसिंग धुड्या गावित यांचे दोंडाईचा-नंदुरबार रोडवर अपघाती निधन झाले. चरणसिंग हे रेल्वे पोलीस फोर्स दोंडाईचा येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटूंबिय बँकेत खाते बंद करण्यासाठी आले. स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांनी हे खाते सॅलरी पॅकेज अंतर्गत असल्याने त्याला विभा संरक्षण असते, अशी माहिती दिली.
काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याप्रमाणे वारसांनी कागदपत्रे आणली असता त्यांना सॅलरी पॅकेज या योजनेअंतर्गत तब्बल ३० लाख रुपये श्रीमती कल्पनाबाई चरणसिंग गावीत यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. स्टेट बँकेच्या या योजनेअंतर्गत कुठलेही शुल्क आकारले जात नाही. या आधीही बँकेने वेगवेगळ्या योजना ग्राहकांना सांगून त्यांचे खाते व त्यांचा फायदा कसा होईल, या बाबतीत मार्गदर्शनपर मेळावे आयोजित करून जनजागृती केली आहे.
छोटेखानी कार्यक्रमात श्रीमती कल्पनाबाई यांना जिल्हाधिकारी मनिषा खत्री, आमदार डॉ . विजयकुमार गावीत व स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर सुरजीत कुमार साह यांचे हस्ते हे पैसे संपूर्द करण्यात आले. आजादी का अमृत महोत्सव ” या कार्यक्रमात स्टेट बँकेच्या इतरही उपक्रमांची , योजनांची माहीती देण्यात आली. अग्रणी बँकेचे श्री जयंत देशपांडे , नाबार्डचे सहा . महाप्रबंधक श्री प्रमोद पाटील , मुख्य प्रबंधक प्रकाश रणधीर, स्टेट बँक बँक नंदुरबारचे मुख्य प्रबंधक श्री राजेश मिश्रा व मान्यवर उपस्थित होते