नवी दिल्ली – जुळे किंवा तिळ्यांच्या जन्माच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. त्यात काही विशेष नाही. पण मोरोक्कोतील एका महिलेने एकाचवेळी तब्बल ९ मुलांना जन्म दिला आहे. सुदैवाने या सर्व मुलांची तब्येत व्यवस्थित आहे.
हलीमा सीजे असे या महिलेचे नाव आहे. २५ वर्षीय हलीमा हिच्या पोटात सहा मुले आहेत असे वाटत होते. तिची योग्य काळजी घेतली जावी, यासाठी माली सरकारने तिला ३० मार्च रोजी मोरोक्को येथे पाठवले होते.
दरम्यान, देशात ९ मुलांचा जन्म झाल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे मोरोक्कोच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ता रचिद कौधरी यांनी म्हटले आहे. तर मालीच्या आरोग्यमंत्री फांटा सीबी यांनी सांगितले की, हलीमाचे सीझर झाले असून तिने पाच मुली आणि ४ मुलांना जन्म दिला आहे. आई आणि मुलांची तब्येत सध्या स्थिर आहे.
अशाप्रकारच्या आश्चर्यकारक घटना आपण अनेकदा ऐकतो. ब्रिटनमधील एका महिलेने नुकताच एका मुलीला जन्म दिला. या मुलीचे वजन ऐकून तुमचा विश्वासही बसणार नाही. जन्म झाला तेव्हा या मुलीचे वजन होते तब्बल ५ किलो ८०० ग्रॅम.
एम्बर कंबरलँड असे या महिलेचे नाव असून ती ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथील राहणारी आहे. ती स्वत: आपल्या बाळंतपणासाठी खूप एक्साईट होती. तिचे पाेट बघून सगळ्यांना वाटत होते की, तिला जुळी मुले होतील. पण, प्रत्यक्षात एकाच ‘वजनदार’ मुलीचा जन्म झाला. ब्रिटनमधील दुसरे वजनदार बाळ म्हणून ती ओळखली जाणार आहे. यापूर्वी २०१२ मध्ये ब्रिटनमधील एका महिलेने साडे सहा किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला होता.