इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमात काहीही होऊ शकते असे म्हणतात. त्यामुळेच तब्बल ४ मुले असलेली एक महिला आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी आग्रही होती. सासरच्या मंडळींना चुकविण्यासाठी तिने मोठीच शक्कल लढविली. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) येणाऱ्या नोएडा परिसरात ही घटना घडली आहे.
जुनैदपूर गावातील रहिवासी असलेले तीन सख्खे भाऊ आणि त्यांची ७५ वर्षीय वृद्ध आई यांना सकाळी शेजाऱ्यांनी बेशुद्ध अवस्थेत पाहिले. या सर्वांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांना अंमली पदार्थ देण्यात आल्याचे पुढे आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त डीसीपी विशाल पांडे आणि एसीपी बृजनंदन राय पोलिसांच्या ताफ्यासह पोहोचले. त्यांनी घरच्यांची विचारपूस केली. पतीसह चौघांना गुंगीचे औषध पाजून सूनबाई आपल्या चारही मुलांना घेऊन प्रियकरासोबत फरार झाल्याची बाब समोर आली आहे. या आरोपी महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.
अंमली पदार्थांच्या सेवनामुळे एका कुटुंबातील सदस्यांची प्रकृती बिघडल्याचे सर्वप्रथम सांगण्यात आले. मात्र, घरातील सूनबाईच तिच्या ३ मुली आणि एका मुलासह प्रियकरासोबत पळून गेली आहे. दनकौर भागातील जुनेदपूर गावातील हा प्रकार आहे. फरारी महिलेने पतीसह सासरच्या चार जणांना गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर ती चारही मुलांना घेऊन फरार झाली आहे.