पतीच्या अपघातानंतरही
द्राक्ष शेती फुलविणाऱ्या
मोहाडीच्या जयश्री जाधव
मागील वर्षी जयश्रीताईंचे पती संतोष जाधव यांचा एका अपघातामध्ये पाय मोडला ज्या घटनेमध्ये घर, मुलं आणि मुख्य म्हणजे शेती हि सर्व जबाबदारी जयश्रीताईंवर आलेली होती. शेतात पूर्णपणे द्राक्षबाग असून ती सबकेन अवस्थेत आली होती. त्या दरम्यान सर्व नियोजन हे जयश्रीताई पाहत होत्या ज्यामध्ये बागेला पावडर मारणे, मजूर सांभाळणे तसेच शेतीसंदर्भात इतर सर्व कामे त्या एकट्याने पाहत होत्या. साधारण ऑक्टोबर दरम्यान पती संतोष यांच्या पायाची स्थिती बऱ्यापैकी सुधरत आलेली असताना कुठेतरी दिलासादायक परिस्थिती निर्माण झालेली होती.
त्याच दरम्यान संतोष जाधव हे दुचाकी वाहनावरून प्रवास करत असताना हातावर साप येऊन बसल्याने गाडीचा तोल सुटून पुन्हा त्यांचा अपघात होऊन दुर्दैवाने त्याच पायाला त्यांच्या पुन्हा दुखापत झाली. या सर्व परिस्थितीत कुठेही धीर न सोडता नियतीच्या या सर्व संकटाना जयश्रीताई खंबीरपणे सामोरे जात होत्या. या काळात एप्रिल छाटणी ते ऑक्टोबर छाटणी पर्यंतचे सर्व नियोजन ताईंनी एकट्याने सांभाळले होते. या सर्व घटनेत ताईंचे धैर्य आणि हिमतीने ज्या प्रकारे हि परिस्थिती सावरून घेतली या सगळ्याचे मूळ त्यांच्या मागील भूतकाळात होते.
चासनळी, कोपरगाव येथील माहेर असलेल्या जयश्रीताईंचे १२वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले होते. वडील साखर कारखान्यात नोकरीस होते. वडील नोकरीस असल्याने घरचे शेतीचे व्यवस्थापन हे पूर्णपणे आई बघत होती. त्यातूनच एक महिला कशा प्रकारे कुटुंब आणि शेतीचे व्यवस्थापन करू शकते याची प्रेरणा त्यांना आपल्या आईकडून मिळत गेली होती. याच काळात ताईना शिवणकामाची आवड असल्याने त्यांनी त्यासाठी प्रशिक्षण घेतले. दरम्यान २००५ साली आई आणि वडिलांचा एक अपघात झाला आणि या अपघातात दोघांना मोठी दुखापत झाली.
घरी शेतात भोपळे लावलेले होते.अश्या परिस्थितीत घरची शेती हि वाऱ्यावर सोडून देऊन चालणार नाही. मोठा भाऊ हा शिक्षणामुळे बाहेर असल्याने अश्या परिस्थितीत ताई व त्यांची बहीण या दोघीनी पुढाकार घ्यायचे ठरवले आणि कुटुंब आणि शेती या दोन्ही जबाबदाऱ्या त्या साधारण २ वर्षे त्यांनी सांभाळल्या. एकंदरीत माहेरच्या या अनुभवातूनच जयश्रीताईंना भविष्यात कुठल्याही संकटाशी लढण्याची एक ऊर्जा मिळाली. २००८ साली मोहाडी, नाशिक येथील संतोष जाधव यांच्याशी ताईंचा विवाह झाला होता.
सासरी ४ एकर द्राक्षशेती होती. पती संतोष जाधव हेदेखील शेती करत असल्याने त्यांच्याकडून द्राक्ष शेतीविषयी माहिती होत गेली. त्यावेळी यंत्रसामग्रीचा तुटवडा असल्याने पावडर मारण्यासाठी देखील दोघे मिळून नळीने पावडर मारत. द्राक्ष स्थानिक बाजारपेठेत व अधून मधून निर्यात केली जात. २०१३ साली शेतीतून आलेल्या उत्पन्नातून एक ट्रॅक्टर खरेदी केला. पती संतोष यांनी यामध्ये ‘लोक काय म्हणतील’ हा कुठलाही विचार न करता ताईंना ट्रॅक्टर देखील चालवायला शिकवले सर्व काही एकमेकांच्या साथीने सुरळीत चालू असताना पती संतोष यांच्या अपघाताचा काळ हा खडतर होता.
सोबत एक मुलगा व एक मुलगी यांची देखील जबाबदारी होतीच त्यासाठी सासू- सासरे यांचादेखील महत्वाचा आधार होता. आज शेती म्हणले की चढ उतार हे आलेच. त्यासाठी शेतीबरोबर एक जोडधंदा म्हणून ताईंनी आपले शिवणकाम देखील सुरूच ठेवलेले आहे. पण आयुष्यात आलेल्या या चढ उतारांमुळे भविष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटास तोंड देण्यास ताई आज सक्षम आहेत. आपला लढाऊ बाणा बाळगत आयुष्यातल्या प्रत्येक संकटाशी झुंजणार्या जयश्रीताईंना सलाम!