नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सासरी कमी जमीन क्षेत्र असतांना हे जमिनीचे क्षेत्र स्वत:च्या हिंमतीवर वाढविण्याचा ध्यास एका नवदुर्गेने घेतला.आर्थिक स्थिती बेताची असतानाही तिने अत्यंत काटकसरीने संसार करीत अहोरात्र श्रमदेवतेची आराधना केली आणि चित्र बदलून दाखविले. ही कथा आहे छाया बुरके यांची.
माहेरी असताना छाया यांना प्रत्यक्ष शेतीकामाचा थेट असा अनुभव नव्हता. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. सासरी पती, दीर-जाऊ, सासू-सासरे असे कुटुंब होते. शेती क्षेत्र हे अवघे 2 बिघे इतके होते. त्यात ऊस व भाजीपाला पिकांची लागवड केली जात होती. जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायही होता. त्यासोबत गावात भरणाऱ्या यात्रेदरम्यान ऊस रसवंतीचाही व्यवसाय बुरके कुटुंब करीत होते. रोज पहाटे उठून ऊस तोडून पुन्हा घरचं आवरून छाया देखील रसवंतीच्या कामाला हातभार लावित होत्या. जमीन क्षेत्र कमी असल्याने संपूर्ण बुरके कुटुंबाचीच उत्पन्न वाढीची धडपड सुरु असायची.
पती किरण आणि त्यांचे भाऊ यांनी पिकअप गाडीचाही नवीन व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे त्यांना शेतीमध्ये फारसे लक्ष देता येत नव्हतं. छाया आणि त्यांच्या जाऊबाई इतरांच्या शेतावर काम करण्यास जात. छाया यांनी इतर ठिकाणी काम करण्यापेक्षा आपल्या घरच्या शेतीकडे जास्त लक्ष द्यावे असे पती किरण यांनी त्यांना सुचविले. छाया यांनीही त्याबाबत सकारात्मक विचार केला. शेतीक्षेत्र कमी असले तरी आपण ते चांगले करु व चांगले उत्पन्न मिळवू असा निश्चय त्यांनी आता केला. जाऊबाई आणि सासूबाई यादेखील सोबतीला होत्या. घरचे पुरुष जरी व्यवसायामुळे बाहेर असले तरी आपण स्त्रिया मिळून शेतीचे चित्र बदलू शकतो हा विचार घेऊन त्यांनी जिद्दीने कामास सुरुवात केली.
घरी शेतीची कामे सासूबाई आणि जाऊबाई करायच्या तर गायींचा गोठा आणि भाजीपाला विक्रीची कामे छाया करत असत. यामध्ये भाजीपाला विक्री करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागे. सकाळी भाजीपाला काढणी केल्यानंतर दुपारी 1 च्या लोकल रेल्वेने त्या नाशिक रोडला जाऊन भाजीपाला विक्री करायच्या. 6 वाजेपर्यंत भाजीपाला विक्री करून 6 ला रेल्वेने परत येत. कधी रेल्वे सुटली तर घरी परतण्यासाठी दुसऱ्या खासगी वाहनाने 200-250 रुपये भाडे देऊन रात्री 11-12 वाजता येत असत. रेल्वे तिकीट अवघे 10 रुपये असतांना कधीतरी असा जास्तीचा खर्च करण्याची वेळही त्यांच्यावर येत असे. हा जास्तीचा खर्च करण्याची वेळ पुन्हा येऊ नये म्हणून त्या वेळेच्या नियोजनाची खूप काळजी घेत. ही मोठीच कसरत होती. असा काटकसरीने संसार करीत त्यांनी घर खर्चाला हातभार लावला.
कष्टाला फळे येत होती. गाठीला पैसेही साचत होती. त्यातून त्यांनी एक एकर जमीन खरेदी केली. हे मोठेच यश होते. हे यश त्यांच्या काटेकोर नियोजनाचे होते. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन टोमॅटो पिकाची लागवड केली. घरच्या शेतीतील आणि इतर शेतकर्यांचे टोमॅटो घेऊन पतीने टोमॅटो व्यापारही सुरू केला. छाया यांची टोमॅटो उत्पादन वाढीसाठी मेहनत सुरू होती. ज्या शेतीत पूर्वी फारतर एकरी 1000 क्रेट उत्पादन निघत तिथे आता योग्य व्यवस्थापनाने 2000 क्रेटपर्यंत उत्पादन मिळू लागले होते. पतीच्या व्यवसायाने देखील चांगली गती साधली होती. त्यातून त्यांनी आणखी एक गाडी त्यांनी खरेदी केली.
मूळचे जमीन क्षेत्र कमी असल्यामुळे त्या हताश झाल्या नाहीत. त्यांनी श्रम देवतेची मनोभावे आराधना केली. अत्यंत कमी उत्पन्नातूनही जिद्दीने नवे क्षेत्र खरेदी करण्यापर्यंतचा टप्पा गाठला. यातून त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. अजून शेतीचे क्षेत्र वाढविणे व स्वत:च्या क्षेत्रात नवे टुमदार घर बांधणे हे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी जिद्दीने शेतीच्या कामांत स्वत:ला गाडून घेतले आहे.
Women Farmer Chhaya Burke Success Story