नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्माचार्यांमधील महिलांच्या बदली (Transfer) आणि पदावर नेमणुकीबाबत (Posting) चर्चा सुरू आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही या मुद्द्यावर प्रश्न विचारून त्यावर उत्तरे देण्यात आली. सरकारने महिला कर्मचार्यांची बदली आणि पदावरील नेमणुकीच्या नियमांबाबत सरकार काय करत आहे? सरकारकडून बदलीबाबतचे नवे धोरण आखत आहे का?, केंद्रीय कर्मचार्यांमध्ये किती महिला काम करत आहेत?, यापैकी किती महिला आपल्या कुटुंबापासून दूर आहेत? असे प्रश्न विचारण्यात आले.
सध्या नवे धोरण नाही
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या नोकर्यांमध्ये सध्याच्या नियम आणि अटींनुसारच बदल्या आणि नियुक्त्या होतात. त्यामध्ये सध्या कोणताही बदल केला जाणार नाही. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) सर्व केंद्रीय कर्माचार्यांसह महिला कर्मचार्यांसाठी बदली, नियुक्तीचे नियम तयार केले आहेत. सर्व विभागांनी मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून त्याचे पालन केले जात आहे.
बदल्यांमध्ये या दोन गोष्टी महत्त्वाच्या
जितेंद्र सिंह म्हणाले, बदल्यांबाबतच्या या नियमांमध्ये कर्मचार्यांच्या सेवेचा कमीत कमी काळ आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाने तयार केलेल्या नियमांवर अंमलबजावणी केली जाते. सर्व मंत्रालये आणि विभागांनी आपल्या बदलीबाबतचे धोरण सार्वजनिक केले आहे.
महागाई भत्ता वाढविला
यापूर्वी केंद्र सरकारने १ जुलै २०२१ पासून कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांचा महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला होता. महागाई भत्त्याचा दर १७ टक्क्यांवरून २८ टक्के केला होता. महागाई भत्ता वाढविल्यामुळे केंद्राच्या तिजोरीवर ३४,४०१ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाढणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती.