इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – कौटुंबिक कलह, वाद, भांडणे यातून मार्ग काढण्यासाठी आजही अनेक जण तांत्रिकाच्या नादी लागतात. आस्थेच्या नावाखाली असे तांत्रिक भाबड्या नागरिकांची फसवणूक करतात. आधुनिकतेच्या गप्पा मारणाऱ्या समाजाचे हे ढळढळीत वास्तव लपून राहिलेले नाही. असेच एक वास्तव उघड झाले असून, समाजाची मानसिकता कधी बदलेल हाच प्रश्न उपस्थित होत आहे.
बालासोर (ओडिशा) येथील एका तांत्रिकाने एका महिलेवर तिच्या अडीच वर्षांच्या मुलासमोर ७९ दिवस बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पीडित महिला आणि मुलाची एका बंद असलेल्या खोलीतून सुटका केली आहे. परंतु आरोपी तांत्रिक पळून गेला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, कौटुंबिक कलहातून मार्ग काढण्यासाठी महिलेच्या पतीने आणि तिच्या सासरच्या मंडळींनी तिला तांत्रिकासोबत जबरदस्तीने राहण्यास भाग पाडले. महिलेचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. काही महिने महिला माझ्यासोबत राहिली, तर घरातील कलह कमी होतील अशी बतावणी तांत्रिकाने केली होती.
महिलेने नकार दिल्याने सासूने तिला बेशुद्ध केले. ती जेव्हा शुद्धीत आली तेव्हा तांत्रिकाच्या खोलीत असल्याचे आढळले. कुटुंबीयांनी तिच्या अडीच वर्षांच्या मुलाला तिथेच सोडून दिले होते. तांत्रिक आपला मोबाईल खोलीत सोडून कुठेतरी गेला होता. त्यादरम्यान महिलेने फोन करून माहेरच्या मंडळींना घडलेली घटना सांगितली आणि ही घटना उघडकीस आली आहे.