नवी दिल्ली – महिला खरोखरच किती हिंमतवान असतात याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. आपल्या कुंकवाला वाचविण्यासाठी एक महिला धडपडते आहे. आतापर्यंत तिने तब्बल १ कोटी ४० लाख पतीच्या उपचारावर खर्च केले आहेत. आताही तिला जवळपास दीड कोटी रुपयांची गरज आहे. ही परिस्थिती पाहून या महिलेने थेट पंतप्रधान कार्यालयालाच मोठे आव्हान दिले आहे.
पतीवरील उपचारासाठी येणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा खर्च पीएम केअर फंडातून व्हावा, यासाठी मध्य प्रदेशातील एक महिला सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. मध्यस्थी करून पीएम केअर फंडातून मदत मिळवून देण्याची विनंती याचिकेद्वारे तिने न्यायालयाला केली आहे. त्याचवेळी सुनावणी सुरू असेपर्यंत पतीवर उपचार सुरू राहावेत, असे आदेश देण्याची विनंतीही तिने न्यायालयाला केली आहे.
महिला व तिचा पती दोघेही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. दोघेही एका आयटी कंपनीत नोकरीला आहेत. गेल्यावर्षीच १९ जूनला त्यांचे लग्न झाले. पतीला मे मध्ये कोरोना झाला. त्यातून बरा होऊन घरी आल्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडली. त्यामुळे भोपाळच्या मोठ्या रुग्णालयात भरती केले. मात्र लंग्स फायब्रोसिस (फुफ्फुसांना गंभीर संसर्ग) झाल्यामुळे फुप्फुसाचे प्रत्यारोपण (ट्रान्सप्लान्ट) अनिवार्य आहे.
अशात तेलंगाणा येथील सिकंदराबादमध्ये त्याला भरती करण्यात आले. सध्या तो ईसीएमओ सपोर्टवर आहे. आतापर्यंत त्याच्या उपचारावर १ कोटी ४० लाख रुपये खर्च झाले आहेत. पुढे आणखी जवळपास १ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या उपचारात दररोज दोन लाख रुपये आणि आठ दिवसांतून एकदा ४ लाख रुपये असा खर्च येत आहे. ट्रान्सप्लान्टनंतर रुग्ण पूर्णपणे बरा होईल, असा डॉक्टरांना विश्वास आहे.
उपचारात आतापर्यंत कुटुंबातील सर्वांचाच पैसा खर्च झालेला आहे. त्यामुळे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत पीएम केअर फंडातून आपल्याला मदत व्हावी, अशी महिलेची अपेक्षा आहे. तिने दिल्लीत येऊन प्रयत्न केले तेव्हा पीएमओतून तीन लाख रुपयांच्या मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र तीन लाख रुपयांत काहीच होणार नव्हते. त्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायालय काय निकाल देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण, हा खटला, त्याची सुनावणी आणि निकालही ऐतिहासिकच असणार आहे.