मुंबई – सोशल माध्यमेही अतिशय शक्तीशाली माध्यमे आहेत. त्यामुळे अनेक जटील प्रश्न सुटतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांच्या तत्परतेमुळे एका असहाय महिलेला मोठी मदत झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव या गावातील तलाठी वारस नोंद करीत नसल्याची महिलेची तक्रार होती. तब्बल २ ते अडीच वर्षांपासून ती पाठपुरावा करीत होती. अखेर तिने आमरण उपोषण सुरू केले. त्याची दखल फारशी कुणी घेतली नाही. झगडे यांच्या निदर्शनास ही बाब सोशल मिडियामुळे आली. त्यांनी तत्काळ नाशिक विभागीय महसूल आयुक्तांच्या स्वीय सहायकांना यासंबंधी कळविले. त्यांनी संबंधित तलाठ्याला फोन केला. त्याने क्षणाचाही विलंब न करता वारसाची नोंद केली आणि महिलेला दिलासा मिळाला. यासंदर्भात स्वतः झगडे यांनीच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर हा सर्व प्रकार कथन केला आहे. त्यांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल माध्यमांची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. बघा श्री महेश झगडे यांची फेसबुक पोस्ट
https://www.facebook.com/100001296815651/posts/4599295283456987/