इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एका महिलेने न कळवता तिच्या जोडीदाराच्या कंडोमला छेद देऊन ‘फसवणूक’ केल्याप्रकरणी तिला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा जर्मन न्यायालयाने सुनावली आहे. एका महिला न्यायाधीशांनी याला जर्मन कायद्यातील ऐतिहासिक केस म्हटले आहे.
पश्चिम जर्मनीतील न्यायालयाने एका महिलेला लैंगिक गैरवर्तनाचे दोषी ठरविले. तसेच, तिला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तिच्या जोडीदाराच्या कंडोमला जाणीवपूर्वक नुकसान केल्याप्रकरणी महिलेला दोषी ठरवण्यात आले आहे. शिक्षा सुनावताना न्यायाधीश म्हणाले की, जर्मन कायद्याच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ही एक अनोखी केस आहे.
पश्चिम जर्मनीतील बिलेफेल्डच्या प्रादेशिक न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण एका 39 वर्षीय महिलेशी संबंधित आहे. जिचे 42 वर्षीय पुरुषासोबत मैत्रीचे संबंध होते. दोघे 2021 मध्ये एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर भेटले आणि त्यानंतर त्यांच्यात प्रासंगिक लैंगिक संबंध निर्माण झाले. महिलेचे तिच्या जोडीदारावर खूप प्रेम होते. परंतु तिला माहित होते की, या नात्यात त्याला कोणत्याही प्रकारची बांधिलकी नको आहे. या महिलेने जाणूनबुजून आणि त्याला न सांगता जोडीदाराच्या घरी ठेवलेल्या कंडोममध्ये छिद्र पाडले. तिचे प्रयत्न अयशस्वी ठरले, तरी तिला गरोदर राहायचे होते. इतकंच नाही तर तिने नंतर तिच्या पार्टनरला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला की तिला आपण गरोदर असल्याचे वाटते आणि तिने जाणूनबुजून कंडोमला छेद दिल्याचेही सांगितले. यानंतर साथीदाराने तिच्यावर गुन्हा दाखल केला.