इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तीन दिवस लिफ्टमध्ये अडकल्यामुळे उझबेकिस्तानमधील ताश्कंदच्या ३२ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ओल्गा लिओनटीव्ह हे मृत महिलेचे नाव असून ती डिलेव्हरी ड्रायव्हर होती. नऊ मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये ही महिला अडकली होती. २४ जुलैपासून ही महिला बेपत्ता होती.
ही महिला आत गेल्यानंतर लिफ्ट तुटली आणि सुरक्षा यंत्रणा काम करत नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. लिफ्टचे काम सुरू असताना या महिलेचा मृतदेह आढळून आला. इमारतीतील रहिवाशांनी सांगितले की, लिफ्टमधील बिघाडच या दुर्घटनेला कारणीभूत आहे. तर दुसरीकडे घटनेच्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लिफ्टच्या बिघाडामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. २४ जुलै रोजी ही महिला कामावर होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे महिलेचा कुटुंबियांनी शोध सुरू केला. नातेवाईक व आजूबाजूच्या रहिवाशांनी बराच शोध घेतला मात्र ती सापडली नाही. शोध घेत असताना लिफ्टमध्ये ओल्गा मृतावस्थेत आढळून आली. लिफ्ट नऊ मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहोचली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला पण तिचे कोणीही ऐकले नाही. २४ जुलै रोजी काम आटोपून घरी परतत असताना ही महिला लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.
32 year old woman lost her life after being stuck in an elevator for three days Uzbekistan tashkand international