नाशिक – ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याची तपासणी करता यावी यासाठी नाशिकमधील वोक्हार्ट हॉस्पिटलने आज जागतिक आरोग्यदिनाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून “घे भरारी” हा विशेष उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत एक महिनाभर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मधुमेह आणि हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उपक्रमादरम्यान तज्ज्ञ डॉक्टर जनजागृतीपर चर्चा करणार आहेत.
आरोग्य तपासणी शिबिर वडाळा नाका येथील वणी हाऊस वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ११ एप्रिल ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान पार पडेल. ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबिर खुले आहे. ओळख पडताळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी शिबिरात येताना त्यांचे आधार कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता आहे.या शिबिराबाबत वोक्हार्ट हॉस्पिटलमधील एका वरिष्ठ व्यवस्थापकाने सांगितले की, “आम्ही सर्व नाशिककरांचे आणि विशेषतः: ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत जागरूक आहोत. सर्व ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या वैद्यकीय समस्यांपासून पूर्णपणे मुक्तता व्हावी हा आमचा उद्देश आहे. त्याबाबतचे आमचे प्रयत्न सुरू असून आम्हाला विश्वास आहे की, चांगल्या परिणामांसह सर्व समस्या सुरळीतपणे सोडविल्या जातील. ”
२००८ मध्ये स्थापन झालेले वोक्हार्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे. हे एक समर्पित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ज्यात कार्डिऑलॉजी, कार्डियाक सर्जरी, न्यूरॉलॉजी, न्यूरो सर्जरी, ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीबाबतचे सर्वसमावेशक उपचार काळजीपूर्वक पुरवते. यासह या हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजी, युरॉलॉजी, क्रिटिकल केअर, वैद्यकीय आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी, आपत्कालीन सेवा आणि ट्रामा लाइनबाबचे उपचार केले जातात.