मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अगदी एका कॉलवर तत्काळ पोलिस मदत उपलब्ध करून देणाऱ्या पोलिस नियंत्रण कक्षाची उपयोगिता वेळोवेळी सिद्ध झाली आहे. सर्वसामान्यांच्या उपयोगाची ही व्यवस्था असली तरी विनाकारण कॉल करून यंत्रणेलाच वेठीस धरणारे महाभागही काही कमी नाही. मुंबईतील नियंत्रण कक्षातही असाच एक व्यक्ती नियमित कॉल करून महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लिल संभाषण करीत होता. तब्बल तीन वर्षे शोध घेतल्यानंतर हा महाभाग हाती लागला आहे.
गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद काठे यांच्या नेतृत्वातील पथकाने या फोनधारकाचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने कुरारमधून कॉल करणाऱ्या २२ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. मात्र, हा मुलगा गतिमंद असल्याचे समोर आल्याने पोलिसांना त्याला नोटीस देऊन सोडून द्यावे लागले. हा मुलगा २०२० पासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कॉल करून महिला पोलिसांशी अश्लील संवाद साधत होता. गुन्हे शाखेने याच कॉलची छाननी करून तांत्रिक पुराव्याच्या मदतीने क्रमांकांची जुळवाजुळव करीत कुरारमधील मुलापर्यंत पोहोचले.
सीमकार्ड नसलेल्या मोबाईलवरून कॉल
मुलाच्या विक्षिप्त स्वभावामुळे आई-वडिलांनी त्याला साधा फोन वापरण्यास दिला होता. त्यात सीमकार्डही नव्हते. सीमकार्ड नसले तरी मोबाईलवरून पोलिसांच्या १०० क्रमांकावर कॉल लागत होता. याचाच फायदा घेत त्याच्याकडून अशाप्रकारे सतत कॉल करून अश्लील भाषेत बोलत असल्याचे तपासांत समोर आले आहे. तीन वर्षांत आरोपीचे तब्बल १० हजार ३०० अश्लील कॉल नियंत्रण कक्षात धडकले होते. कॉलची छाननीही झाली. मात्र, सिमकार्ड नसलेल्या मोबाईलवरून हा कॉल येत असल्याने आरोपीचा शोध लागत नव्हता. अखेर, तीन वर्षांच्या अथक तपासानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला या कॉलधारकाचा शोध घेण्यात यश आले आहे.
असा लागला शोध
९११ हा क्रमांक आणि पुढील आयएमआय क्रमांकातील ७ क्रमांक एकत्र आल्याने १० अंकी क्रमांक बनून सिमकार्ड नसतानाही कॉल लागत असल्याचे समोर येताच या गुन्ह्याची उकल करण्यास पोलिसांना यश आले. त्याचवरून पोलिस मुलाच्या आयएमआय क्रमांकावरून त्याच्यापर्यंत पोहोचले.
Without Sim Card Mobile Porn Call to Women Police Crime