मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळेच देश लसीकरणावर भर देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतील महत्त्वाच्या टप्प्यात भारताने जगातील पहिली डीएनएवर आधारित लस तयार केली आहे. या तंत्रात लस देताना सुईचा वापर केला जाणार नाही. जायडस कॅडिला कंपनीने त्यासाठी एप्लिकेटरची किंमत निश्चित केली आहे. या एप्लिकेटर किंवा इंजेक्टर गनच्या माध्यमातून वेदनारहित लस दिली जाणार आहे. लशीच्या एका डोससाठी नागरिकांना २६५ रुपये आणि एप्लिकेटरसाठी वेगळे ९३ रुपये अदा करावे लागणार आहेत.
लस देण्याची पद्धत
इंजेक्टर गनच्या माध्यमातून लस दिली जाईल. त्यामुळे सुई टोचण्याची वेदना होणार नाही. या तंत्रात वापरण्यात येणारी इंजेक्टर गन सामान्य इंजेक्शनच्या तुलनेत ५० पट अधिक वेगवान आहे. त्वचावर ठेवून फक्त थोडा दाब द्यावा लागणार आहे. गनच्या वरच्या भागात लागलेले सेंसर शरीरातील नसांचा शोध घेईल. बटन दाबताच लस प्रतिसेकंद २०० मीटरच्या वेगाने शरीरात प्रवेश करेल. ०.३ सेकंदात लशीचा एक डोस नसांमध्ये पोहोचेल. एका व्यक्तीला कोरोनाच्या लशीचा एक डोस ०.५ एमएल दिला जाऊ शकतो. दरम्यान, या लशीची किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु तीन डोस असलेली ही लस १९०० ते २००० रुपयांपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
गन देणार माहिती
फॉर्मा जेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंजेक्टर गन वायफाय युक्त असेल. गनच्या वरच्या भागावर सेंसर लावण्यात आले आहे. हे सेंसर शरीरातील नसांचा शोध घेईल. लस दिल्यानंतर खालच्या बाजूला एका स्क्रिनवर उजव्या बाजूला हिरव्या रंगाचे निशाण दिसेल. त्यामुळे लस योग्यरित्या दिली आहे की नाही हे ते सांगेल. इंजेक्टर गनपर्यंत पोहोचण्यासाठी एप्लिकेटर (लस असेलेले एक उपकरण) चा प्रयोग केला जाईल. हे एप्लिकेटर वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असेल.
यामुळे तंत्र आहे महाग
– प्रत्येक व्यक्तीला आधी २८ आणि ५६ दिवसांत लशीचे तीन डोस द्यावे लागतील.
– प्रत्येक डोसमध्ये दोन शॉट म्हणजेच तीन डोसमध्ये सहा शॉट दिले जातील.
– प्रत्येक डोसमध्ये एक एप्लिकेटरचा वापर केला जाईल. तो ९० रुपयांचा असेल.
– इंजेक्टर गनची किंमत २५ हजार ते ३० हजार रुपये आहे. २० हजार शॉट दिले जाऊ शकतात.
– एका इंजेक्टर गनद्वारे ३,३३३ नागरिकांचे लसीकरण होऊ शकते.