नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आता पॅरासिटामॉलसह अनेक सामान्य औषधे खरेदी करण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही. डॉक्टरांच्या चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) शिवाय खरेदी करता येणाऱ्या अशा 16 औषधांच्या सहज विक्रीला परवानगी देण्याची तयारी सरकार करत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून एक अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात पॅरासिटामॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
पॅरासिटामॉल, डायक्लोफेनाक आणि अँटी-अॅलर्जिक सारख्या 16 औषधांच्या ओव्हर-द-काउंटर (OTC) उत्पादनांच्या विक्रीस परवानगी देण्यास सरकार तयार आहे. आरोग्य मंत्रालयाने या उत्पादनांचा शेड्यूल K मध्ये समावेश करण्यासाठी औषध नियम 1945 मधील बदलांबाबत अधिसूचना जारी केली आहे. मंत्रालयाने महिनाभरात संबंधितांकडून उत्तर मागवले आहे. त्यानंतर यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
या 16 औषधांमध्ये अँटीसेप्टिक आणि जंतुनाशक एजंट्स, क्लोरोहेक्साइडिन माउथवॉश, खोकल्यासाठी डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड लोझेंजेस, अँटी-बॅक्टेरियल अॅक्ने फॉर्म्युलेशन, अँटी फंगल क्रीम, नाक डिकंजेस्टंट, ऍनाल्जेसिक क्रीम फॉर्म्युलेशन आणि अँटी ऍलर्जी कॅप्सूल यांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदीसाठी काही अटी देखील समाविष्ट आहेत. या औषधांचा जास्तीत जास्त वापर आणि उपचारांचा कालावधी 5 दिवसांपेक्षा जास्त नसावा. तसेच औषधे घेतल्यानंतरही लक्षणे संपत नसल्याने रुग्णाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागणार आहे.