मुंबई – नवरात्रीच्या उत्सवातच राज्यातील जनतेला अघोषित लोडशेडिंगला सामोरे जावे लागत आहे. सलग २ ते ३ तास वीज पुरवठा बंद केला जात आहे. सध्या राज्यात ऑक्टोबर हिट सुरू असतानाच शहरासह ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ पेक्षा अधिक संच बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे. वीजेची तूट काही केल्या भरुन निघत नसल्याने आणि सणासुदीतच नागरिकांचा रोष सहन करावा लागू नये म्हणून अघोषित लोडशेडिंग सुरू करण्याच आले आहे. तसे, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
वीजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यात कुठलेही यश येत नाही. वीजेची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत असल्याने लोडशेडिंगशिवाय अन्य पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच, सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
हे संच पडले बंद
देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.
वीजेचे दर महागले
विजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरु आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून ७०० मेगावॅट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर आज सकाळी रियल टाईम व्यवहारातून ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.
कृषीपंपांना वीज
कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात सातत्याने वीजेची मागणी वाढत आहे. राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे विजेच्या मागणीत काही ठिकाणी काहीशी घट झाली होती.विजेचे भारनियमन टाळण्यासाठी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.