मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या ऑनलाईन बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असले तरी अनेक जण एटीएमच्या साह्याने पैसे काढतात, परंतु यापुढे एटीएम सेवा प्रणाली देखील बदलण्याची शक्यता आहे. कारण येत्या काही दिवसांत सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कवर कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या मते, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कवर कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात एनपीसीआय, एटीएम नेटवर्क आणि बँकांना लवकरच स्वतंत्र सूचना जारी केल्या जातील.
गव्हर्नर दास यांच्या म्हणण्यानुसार, कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा कार्ड क्लोनिंग इत्यादीसारख्या फसवणुकीला प्रतिबंध करण्यास मदत करेल. सध्या, कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा देशभरातील निवडक बँकांमध्येच उपलब्ध आहे.
याबाबत शक्तीकांत दास यांनी असेही सांगितले की RBI नियमन केलेल्या संस्थांमधील ग्राहक सेवा मानकांचे पुनरावलोकन करेल. ग्राहक सेवेची सद्यस्थिती तपासण्यासाठी आणि पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आर्थिक आढावा बैठकीत रेपो दर पुन्हा एकदा स्थिर ठेवण्यात आला आहे. रेपो दर सलग 11व्यांदा कोणताही बदल न करता 4 टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर राहिला. याचा अर्थ बँकेच्या कर्जाच्या मासिक हप्त्यात कोणताही बदल होणार नाही.