विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर रुग्णालयात दाखल करणे, औषधे देणे, लसीकरण करण्यापासून कोही नकार देऊ शकत नाही, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) स्पष्ट करण्यात आले आहे. कोणतीही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आधारकार्ड नसल्याचे कारण दिले जाऊ शकत नाही, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
देशात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर यूआयडीएआयचे निवेदन महत्त्वाचे मानले जात आहे. आधारच्या प्रकरणात अपवादात्मकरित्या १२ आकड्यांच्या बायोमॅट्रिक ओळखपत्राविना सेवा आणि लाभ देणे आवश्यक आहे.
एखाद्या नागरिकाकडे कोणत्याही कारणामुळे आधारकार्ड नसले तर आधार अधिनियमाअंतर्गत त्याला सेवा प्रदान करण्यात मनाई केली जाऊ शकत नाही, असे यूआयडीएआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
आधारकार्ड नसल्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासारख्या आवश्यक सेवांपासून वंचित राहावे लागत असल्याचे वृत्त अनेक ठिकाणांहून आले आहे. त्यामुळे यूआयडीएआयने स्पष्टीकरण दिले आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर कोरोना लसीकरणासाठी आधारकार्ड मागितले जात आहे. त्यामध्ये आधारकार्डऐवजी इतर पर्यायसुद्धा देण्यात आले असून, त्याद्वारे तुम्ही लसीकरण करू शकतात.