पुणे – भारतीय शेअर बाजारात अनेक अशा कंपन्या आहेत, ज्यांना गुतंवणूकदारांना काही दिवस, काही महिने किंवा काही वर्षांमध्ये मालामाल केले आहे. अशा कंपन्यांमध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या कंपनीचा समावेश आहे. शेअर बाजारात दोन वर्षांपूर्वी लिस्टेड झालेल्या आयआरसीटीसीच्या स्टॉकने मोठी उसळी घेतली आहे. आयआरसीटीसीच्या लिस्टिंगच्या दिवशी ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीचा एक शेअर जरी खरेदी केला असेल तर त्यांना ३,८०० रुपयांहून अधिक फायदा झाला आहे.
भारतीय शेअर बाजारात १४ ऑक्टोबर २०१९ रोजी आयआरसीटीसीची लिस्टिंग झाली होती. बीएसई इंडेक्सवर कंपनीची लिस्टिंग ६४४ रुपयांवर झाली होती. याचाच असा अर्थ होतो की त्या दिवशी लिस्टिंगच्या वेळी कंपनीच्या शेअरचा भाव ६४४ रुपये होता. व्यवसायाच्या दिवशी तो ७०० रुपयांच्या वर गेला. ज्या गुंतवणूकदारांनी ६४४ रुपयांच्या भावावर शेअर खरेदी केला असेल, तो आजच्या तारखेला प्रति स्टॉक जवळपास ३,८०० रुपयांहून अधिक फायद्यात असेल.
बीएसई इंडेक्सवर ६ ऑक्टोबरला आयआरसीटीसीच्या क्लोसिंग शेअरचा भाव ४४६३.६५ रुपये आहे. त्यानुसार (४४६३.६५-६४४ रुपये) प्रति शेअरचा फायदा ३,८२० रुपयांच्या जवळपास आहे. बुधवारी आयआरसीटीसीच्या शेअरचा भाव जवळपास ७.१३ टक्के वाढून बंद झाला. ५ ऑक्टोबरला आयआरसीटीसीच्या शेअरचा भाव ४,५१२ रुपयांवर गेला होता. तो पूर्ण वेळ उच्चांकावरच आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल ७१,४१८.४० कोटी रुपये झाले आहे. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा मार्केट कॅपिटल ११ हजार कोटी रुपयांच्या जवळ होता. दोन वर्षात मार्केट कॅपिटल ६० हजार कोटी रुपयांनी वाढला आहे.