विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आपला भाचा नीरव मोदी याच्यासोबत मिळून भारतातील बँकांना १५ हजार कोटी रुपयांचा चुना लावल्यानंतर फरार झालेला भामटा मेहूल चोकसीला डोमिनिका पोलिसांनी अटक केली असून आता त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्नांना वेग आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मेहूल चोकसीला भारतात आणले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकेकाळी भारतातील एक प्रसिद्ध हिरे व्यापारी म्हणून मेहूल चोकसीची ओळख होती. पण ज्या देशाने त्याला भरभरून दिले त्यालाच चुना लावून तो अँटिगुआला फरार झाला होता. दोन दिवसांपूर्वी तो तेथूनही फरार झाला होता. पण डोमिनिका पोलिसांनी त्याला दुसऱ्याच दिवशी अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. याचदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी अँटिगुआ व डोमिनिकाशी थेट संपर्क साधला आणि चोकसीला भारतात आणण्याची मागणी केली.
दोन्ही देशांसोबत सध्या भारताची चर्चा सुरू आहे. भारतात आर्थिक घोटाळा करून विदेशात पळून जाणारा मेहूल चोकसी हा पहिला मोठा व्यापारी असेल ज्याला भारतात आणले जाईल. त्याचा साथीदार नीरव मोदी यालाही इंग्लंडवरून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर विजय माल्याला भारतात आणण्यासाठी अद्याप ब्रिटनच्या न्यायालयांमध्ये भारताची लढाई सुरूच आहे.
भारताचे काम झाले सोपे
२०१८ मध्ये चोकसीने भारत आणि येथील नागरिकत्व सोडून अँटिगुआ व बारबुडाला पलायन केले होते. तेथील नागरिकत्वदेखील त्याने मिळविले. अँटिगुआमधून थेट प्रत्यार्पण शक्य नसल्याने त्याला भारतात आणण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र चोकसीने डोमिनिकाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला आणि भारताचे काम सोपे झाले.
शरीरावर जखमा
मेहूल चोकसीच्या शरीरावर जखमा असल्याचे आपल्याला सांगण्यात आले आहे, असा दावा त्याचे वकील विजय श्रीवास्तव यांनी केला आहे. त्याचवेळी डोमिनिका येथील सर्व कायदेशीर तरतुदी तपासून चोकसीला अँटिगुआला परत आणण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सांगतानाच चोकसीला बळजबरी अंटिगुआतून डोमिनिकाला नेण्यात आले, असा आरोपही त्याच्या वकिलांनी केला आहे.