बंगळुरु – कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तोच आता पुन्हा एकदा देशभरात काही राज्यांमध्ये विशेषत: केरळ पाठोपाठ कर्नाटकातील बंगळुरु शहरात या तिसऱ्या लाटाचा धोका मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. केवळ ११ दिवसांत ५४३ मुले संक्रमित झालेली आढळून आली आहेत. अधिकृत दौऱ्यावरून परतलेले नवनिर्वाचित मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तातडीने तज्ज्ञांसोबत बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे, तज्ज्ञांच्या मतानंतरच मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकात शाळा उघडण्याचे आदेश पारित केले आहेत. परंतु, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात, असे सांगितले जाते.
बंगळुरु महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, ५४३ मुले आणि तरुण यांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीतून आढळले आहे. त्यापैकी बहुतेकांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा अजिबात लक्षणे नाहीत. परंतु काही शास्त्रज्ञ त्याला मोठा धोका मानत आहेत. कारण, लक्षणांशिवाय कोरोना लहान मुलांवर आणि तरुणांवर हल्ला करत आहे. यामुळे तिसऱ्या लाटेची भीतीही वाढत आहे.
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, तिसऱ्या लाटेत मुले आणि तरुणांनी अधिक सुरक्षित असणे आवश्यक आहे. मात्र, यामागे कोणतीही शास्त्रीय माहिती समोर आलेली नाही. परंतु, दुसऱ्या लाटेदरम्यान, मुले आणि तरुण कोरोनाच्या जास्तीत जास्त रुग्णांच्या संपर्कात आले आहेत.
बंगळुरू महानगरपालिकेने नुकतीच जाहीर केलेली आकडेवारी धक्कादायक आहे. सुमारे ५००पेक्षा जास्त मुलांना संसर्ग झाल्याच्या वृताने आरोग्य विभागाची झोपही उडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर, बहुतेक राज्य सरकारे शाळा उघडत आहेत. पण, कोरोनाची नवीन प्रकरणे बाहेर येत असून त्यात तरुण आणि मुले अधिक संक्रमित होत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा शाळा बंद ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.