विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व्हॉटसअॅप या मेसेजिंग अॅपबाबत मोठा खुलासा झाला आहे. अवघ्या महिन्याभरातच व्हॉटसअॅपने भारतातील तब्बल २० लाखाहून अधिक अकाउंटवर बंदी घातली आहे. नवीन मिडीया मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र आचारसंहितेचे पालन न केल्याबद्दल ही कारवाई केली आहे. यासंदर्भातील पहिला मासिक अहवाल कंपनीने प्रसिद्ध केला आहे.
अहवालानुसार कंपनीला १५ मे ते १५ जून या ३० दिवसांच्या कालावधीत एकूण ३४५ अहवाल प्राप्त झाले. तसेच व्हॉट्सअॅप जगभरात एका महिन्यात सुमारे ८० लाख खाती बंद करत आहे. याबाबत व्हॉट्स अॅपने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आमचे मुख्य लक्ष लोकांना मोठ्या प्रमाणात हानिकारक किंवा अयोग्य संदेश पाठविण्यापासून रोखणे आहे. जास्त किंवा असामान्य दराने संदेश पाठविणारी ही खाती ओळखण्यासाठी आम्ही प्रगत क्षमता तयार करत आहोत.
कोणतेही व्हॉट्स अॅप खाते +९१ पासून सुरू होणाऱ्या क्रमांकासह नोंदणीकृत असेल तर ते अॅपवरील भारतीय खाते मानले जाते. त्यावर बंदी घातलेली २० लाख भारतीय खाती ही तिन्ही टप्प्यातील प्रक्रियेनुसार बंद होतील. तसेच स्वयंचलित किंवा बल्क संदेशाचा गैरवापर करणार्या ९५ टक्केहून अधिक खात्यांवर बंदी आणण्यात येणार आहे.
नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत हा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन नियमांतर्गत ५० लक्षाहून अधिक वापरकर्त्यांसह अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर दरमहा नियमपालन अहवाल प्रकाशित करणे आवश्यक आहे. या अहवालात या प्लॅटफॉर्मविषयी त्यांच्याकडून आलेल्या तक्रारी आणि त्यावरील कारवाईचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
दरम्यान, व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त फेसबुकने दुसरा अहवालही प्रसिद्ध केला आहे, त्याची माहिती १५ मे ते १५ जून या कालावधीत तक्रारकर्त्यांमार्फत भारतातील वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींबद्दल देण्यात आली आहे. व्हॉट्स अॅपने भारतासाठी असा पहिला अहवाल प्रकाशित केला आहे. गुगल, फेसबुक आणि ट्विटरनंतर व्हॉट्स अॅप ही चौथी कंपनी सदर अहवाल प्रकाशित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्याची नेमणूक करणार आहे.