मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या रेड झोनमधील १४ जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन १ जूननंतर शिथिल होण्याचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. ते पुढे म्हणाले की, कालच्या माहितीप्रमाणे राज्यातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. येथील निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागणार आहे. जेथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुढील पाच ते सहा दिवसात काय परिस्थिती असेल हे पाहून निर्णय घेतला जाईल असेही सांगितले.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, पण संपलेला नाही. त्यामुळे लोकल पुढील १५ दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या जिल्ह्यात घरातच क्वॉरन्टीन करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. तिथे कोविड सेंटर किंवा संस्थेमध्येच क्वॉरन्टीन केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.