नाशिक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री आज (९ ऑगस्ट) नाशिकमध्ये येत आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ आदी मंत्री नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. हे सर्व मान्यवर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये येणार आहेत. त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमी मध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. शहरात मंत्र्यांचा दौरा असल्याने नाशिक पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे. तसेच, सोमवारी दिवसभर नाशिक शहरात ठिकठिकाणी अत्यंत कडक पोलिस बंदोबस्त राहणार आहे. या प्रकल्पांचे उदघाटन झाल्यानंतर सर्व मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री दुपारच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
काय आहे कार्यक्रम
महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये पोलिस उपनिरीक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. एमपीएससी परीक्षेद्वारे जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांना या अकादमीत खडतर प्रशिक्षण दिले जाते. हेच अधिकारी पुढे राज्याच्या कायद आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सज्ज होतात. या अकादमीत काही प्रकल्प साकारण्यात आले आहेत. त्यात नवनिर्मित इनडोअर फायरिंग रेंज, सिंथेटीक ट्रॅक, अॅस्ट्रो टर्फ फुटबॉल मैदान, अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टॉपिंग हॉलिबॉल, बास्केटबॉल मैदान तसेच निसर्ग नावाचे नूतन नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्प यांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.